सिडकोत ४० हजारांहून अधिक मूर्तींचे संकलन
By Admin | Updated: September 11, 2014 00:27 IST2014-09-10T22:45:35+5:302014-09-11T00:27:21+5:30
सिडकोत ४० हजारांहून अधिक मूर्तींचे संकलन

सिडकोत ४० हजारांहून अधिक मूर्तींचे संकलन
सिडको : महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मूर्तीचे नदीत विसर्जन न करता मूर्ती संकलनाची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. यास यंदाच्या वर्षीही मोठा प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ४१,८५९ गणपती मूर्ती संकलित करण्यात आल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाचे प्रमुख प्रकाश पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आय.टी.आय. पूल येथे सुसज्ज गणेश विसर्जन घाट तयार करण्यात आला होता. याठिकाणी गणेशभक्तांना पार्किंगची व्यवस्था तसेच गणेशमूर्ती व निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. आय.टी.आय. पूल याबरोबरच पवननगर मैदान, राजे संभाजी क्रीडा संकुल, गोविंदनगर येथील न्यू ईरा स्कूल, पिंपळगाव खांब आदि ठिकाणी कृत्रिम तलाव तसेच गणेशमूर्ती दान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मागील वर्षी मनपाच्या सिडको विभागातून सुमारे १८ हजार मूर्तींचे संकलन झाले होते. यंदाच्या वर्षी यात दुपटीहून अधिक वाढ झाली असून, यंदा सुमारे ४१,८५९ मूर्तींचे संकलन झाले. आय.टी.आय. पूल येथील गणेश घाटावर महापालिका आयुक्त पोंक्षे, शहर अभियंता सुनील खुने यांनी भेट दिली व नागरिकांना गणेशमूर्ती पाण्यात न बुडवता दान करण्याबाबत आवाहन केले. गणेश घाटावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश पठाडे, आरोग्य विभागाचे विठ्ठल पवार, माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले, नगरसेवक तानाजी जायभावे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)