सिडकोत होणार अद्ययावत उद्यान भूमिपूजन
By Admin | Updated: December 3, 2015 23:42 IST2015-12-03T23:41:36+5:302015-12-03T23:42:16+5:30
सोहळा : क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅकही साकारणार

सिडकोत होणार अद्ययावत उद्यान भूमिपूजन
सिडको : नाशिक शहर स्मार्ट सिटी व्हावे, यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू असून, यात काहीच वावगे नाही. परंतु यासाठी शहरातील रस्ते, पाणी, वीजव्यवस्था, वृक्षलागवड, शहर स्वच्छतेबरोबरच जास्तीत जास्त जॉगिंग ट्रॅक व उद्यानांची उभारणी करून नागरिकांचे आरोग्य कसे सुखकर राहील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केले.
सिडको प्रभाग ४२ मधील जुन्या मलनिस्सारण केंद्राच्या जागेत माजी सिडको प्रभाग सभापती व नगरसेवक कल्पना पांडे व स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्या वतीने आणि मनपाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या उद्यानाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी भुजबळ बोलत होते.
व्यासपीठावर उपमहापौर गुरुमित बग्गा, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, सिडको प्रभाग सभापती कांचन पाटील, महिला बालकल्याण उपसभापती शीतल भामरे, वत्सला खैरे, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, अनिल मटाले, दिलीप खैरे, अॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे, संतोष सोनपसारे, सचिन महाजन, संजय चव्हाण, अजिंक्य चुंभळे, कैलास चुंभळे, रमेश सोनवणे आदि उपस्थित होते.
शहर हे स्मार्ट सिटी व्हावे, ही नागरिकांचीही इच्छा आहे. परंतु यासाठी नागरिकांवर आर्थिक भार न देता यासाठी दुसरे पर्याय शोधणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. महापौर अशोक मुर्तडक यांनीही मनोगतात याठिकाणी ज्येष्ठांसाठीही हक्काचे व्यासपीठ उभारण्यात येणार असल्याने व नाशिक शहराच्या विकासात यामुळे भर पडणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक शिवाजी चुंभळे व कल्पना चुंभळे यांनीया संकल्पनेची माहिती दिली. (वार्ताहर)