सिडकोत वादळाने नुकसान
By Admin | Updated: May 28, 2014 01:40 IST2014-05-28T00:22:08+5:302014-05-28T01:40:25+5:30
पावसाच्या हलक्या सरी : विक्रेत्यांची उडाली धांदल

सिडकोत वादळाने नुकसान
पावसाच्या हलक्या सरी : विक्रेत्यांची उडाली धांदल
सिडको : पंचवटीसह शहरात काही ठिकाणी जोरदार वादळीवार्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली असली, तरी सिडकोत मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गारांचा पाऊस झाला नसला, तरी वादळीवार्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली, तर वादळी वार्यामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले. अचानक आलेल्या पावसाने विक्रेत्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली, तर बालगोपाळांनी पावसाच्या सरींचा आनंद लुटला.
मंगळवारी दुपारी पावसाच्या सरी कोसळण्यापूर्वी सोसाट्याच्या वादळीवार्याने सिडकोवासीयांची धांडल उडविली. जोरदार वार्यामुळे धूलिकणांनी अवघे वातावरण आच्छादून टाकले होते. त्यामुळे डेक्कन पेट्रोलपंपासमोरील झाड उन्मळून पडले. यात कोणतेही नुकसान झाले नसले, तरी वाहतुकीची कोंडी मात्र झाली. त्यामुळे दत्ता जाधव व त्यांच्या सहकार्यांनी सदरील झाड बाजूला करीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. शिवाजी चौकातही झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजतारांवर पडल्याने तारा तुटल्या आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
सिडकोतील अनेक चौकांमध्ये लावण्यात आलेले जाहिरातींचे व शुभेच्छांचे फलक वादळीवार्याने पडले. पवननगर, उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक, स्टेट बॅँक, गणेश चौक, शिवाजी चौक, राणाप्रताप चौक आदि ठिकाणच्या फलकांचे वादळाने नुकसान होऊन लोंबकळत होते, तर काही तुटून पडले होते.
झोपडपीतील अनेक घरांचे पत्रे वादळाने उडून गेल्याने त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. अनेकांना पावसापासून सामान वाचविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. शिवाजी चौकातील भाजीमंडईतील विक्रेत्यांचीही पावसाने चांगलीच तारांबळ उडविली. सिडकोतील अनेक रस्त्यांवर वादळामुळे झाडांच्या पालापाचोळ्याचा ढीग साचला होता, तर जागोजागी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या.
गारांचा पाऊस नाही
नाशिकसह पंचवटी परिसरात गारांचा पाऊस झाला असला, तरी सिडकोत मात्र गारांचा पाऊस झाला नाही. सोसाट्याच्या वादळीवार्यासह रोहिणीच्या जलधारांनी मात्र हजेरी लावली आणि बालगोपाळांनी त्यात चिंब भिजण्याचा आनंदही लुटला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते.