सिडकोत शिवसेनेचा वरचष्मा; मनसे-कॉँग्रेस भुईसपाट
By Admin | Updated: February 24, 2017 01:29 IST2017-02-24T01:29:11+5:302017-02-24T01:29:24+5:30
दहा विद्यमान पराभूत : तेरा नवीन चेहऱ्यांना संधी; अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का

सिडकोत शिवसेनेचा वरचष्मा; मनसे-कॉँग्रेस भुईसपाट
नरेंद्र दंडगव्हाळ सिडको
गेल्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या भाजपाने आठ जागांवर घेतलेली उडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व कॉँग्रेस या तीन पक्षांचा उडालेला धुव्वा शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडला असून, सिडकोत शिवसेनेने सर्वाधिक जागा घेत आपला वरचष्मा सिद्ध केला आहे. या निवडणुकीत दहा विद्यमान नगरसेवकांना पराभवाची चव चाखावी लागली, तर नऊ नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे.
सिडकोतील सहा प्रभागातील एकूण २४ जागांपैकी शिवसेनेने पंधरा, भाजपाला पाच व राष्ट्रवादी कॉँग्रेसला एका जागेवरच समाधान मानावे लागले आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सर्वच उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशा परिस्थितीत मतदारांनी शिवसेनेला पहिली पसंती देत परिवर्तन घडविले. मंगळवारी झालेल्या मतदानात सिडकोत ६१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. त्याची मोजणी संभाजी स्टेडियम व विवेकानंद सभागृहात करण्यात आली. साधारणत: साडेबारा वाजता पहिला निकाल प्रभाग क्रमांक २५ चा जाहीर करण्यात आला. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर या दाम्पत्याने खाते उघडले व शिवसेनेने जल्लोष केला. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक निवडून आले होते, मात्र या निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नाही. या पक्षाचे सध्याचे नगरसेवक अनिल मटाले, कांचन पाटील यांच्यासह शिवसेनेत गेलेले अरविंद शेळके, शीतल भामरे यांना पराभव पत्करावा लागला.
शिवसेनेला मतदारांनी पहिली पसंती दिल्याने त्यात कल्पना पांडे, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, दिलीप दातीर या नगरसेवकांना पुन्हा संधी दिली, तर श्याम साबळे, बंटी तिदमे, हर्षदा गायकर, भागवत आरोटे, किरण गामणे, चंद्रकांत खाडे, दीपक दातीर हे नवीन चेहरेही महापालिकेत पोहोचले आहेत. भाजपाकडून माजी नगरसेवक अलका अहिरे, प्रतिभा पवार या दोघांना तर नवीन चेहऱ्यांमध्ये भाग्यश्री ढोमसे, कावेरी घुगे, राकेश दोंदे, मुकेश सहाणे, छाया उघडे व नीलेश ठाकरे यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीकडून मात्र राजेंद्र महाले यांनी हॅट्ट्रिक साधली आहे.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पंधरा वर्षे नगरसेवक राहिलेले कॉँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, माकपाचे तानाजी जायभावे, दहा वर्षे नगरसेवक राहिलेल्या अश्विनी बोरस्ते यांच्यासह विद्यमान नगरसेवक शोभा निकम, उत्तम दोंदे व शोभा फडोळ यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. सेना पुरस्कृतांचा पराभव
सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिवसेनेने उमेदवारी देण्यावरून गोंधळ घातला. या प्रभागात दीपक बडगुजर व भूषण देवरे या दोघांना अगोदर उमेदवारी जाहीर करण्यात आली व त्यांच्याकडे एबी फॉर्म देण्यात आले, परंतु पक्षाने पुन्हा बडगुजर व देवरे यांना माघार घेण्यास भाग पाडले व त्यांच्याऐवजी माजी नगरसेवक सतीश खैरनार व विद्यमान नगरसेवक अरविंद शेळके या दोघांना पुरस्कृत केले, परंतु मतदारांपर्यंत ते पोहोचविण्यात ते अपशयी ठरल्याने शिवसेनेला त्याचा फटका बसला. खैरनार व शेळके यांचा पराभव झाला. त्याचा फायदा भाजपाला झाला.महाले यांच्या कुटुंबात थोडी खुशी, थोडा गम
राष्ट्रवादीचे नेते नाना महाले यांच्या कुटुंबातील पुत्र अमोल नामदेव महाले हे प्रभाग क्रमांक २९ मधून नशीब अजमावित होते, तर पुतणे राजेंद्र महाले हे प्रभाग क्रमांक २४ मधून उभे होते. अमोल महाले यांनी चौथ्या फेरीपर्यंत चांगली आघाडी घेतली व त्यानंतर मात्र ते पिछाडीवर गेले. राजेंद्र महाले यांनी मात्र पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवून विजय संपादन केला. महाले कुटुंबाला एकाचा विजय व दुसऱ्याचा पराभव स्वीकारावा लागला.चुंभळे यांनाही झटका
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या शिवाजी चुंभळे, कल्पना चुंभळे या दाम्पत्याने पुन्हा निवडणुकीची तयारी केली होती, परंतु सेनेने शिवाजी चुंभळे यांना उमेदवारी नाकारत कल्पना चुंभळे यांना प्रभाग २४ मध्ये उमेदवारी दिली, तर चुंभळे यांचा पुतण्या कैलास यांनाही याच प्रभागात तिकीट दिले. प्रत्यक्षात निवडणुकीत मतदारांनी कैलास चुंभळे याचा पराभव करून शिवाजी चुंभळे यांना झटका दिला.