सिडकोत शालेय विद्यार्थ्यांचा थरार...

By Admin | Updated: September 29, 2015 22:37 IST2015-09-29T22:34:47+5:302015-09-29T22:37:05+5:30

भररस्त्यात चाकू हल्ला

Cidcoat school students thump ... | सिडकोत शालेय विद्यार्थ्यांचा थरार...

सिडकोत शालेय विद्यार्थ्यांचा थरार...


सिडको :
वेळ : दुपारी १२.०० वाजेची.
ठिकाण : दत्तचौक, सिडको.

शाळकरी विद्यार्थ्यांचे एक टोळके भररस्त्यात हातात चाकू घेऊन एका विद्यार्थ्याचा पाठलाग करीत होते. त्या टोळक्याने विद्यार्थ्यास गाठले आणि त्याच्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. भररस्त्यातील हा थरार पाहून रस्त्याने जाणारे-येणारेही आवाक् झाले होते.
चित्रपटातील गॅँगवारप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी दहशत माजविल्याने सिडकोतील गुन्हगारी कोणत्या थराला गेली आहे, याची प्रचिती आली. अतिशय संवेदनशील बनलेल्या सिडकोत दिवसाढवळ्या घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे सिडको सुरक्षित राहिले नाही, हे पुन्हा एकदा समोर आले.
सिडकोतील कुविख्यात टोळ्यांची दहशत असतानाच गल्लोगल्ली आणि चौकाचौकातील भाईगिरीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. महिला आणि मुलींना तर घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून, महिलांची छेड काढण्याच्या प्रकारांत वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या लुटमार, छेडछाड, मारहाण यांसारखे प्रकार केवळ सराईत गुन्हेगारामंध्येच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे.
गल्ली तेथे दादा अशीच काहीशी सिडकोतील परिस्थिती आहे. येथील गुन्हेगारांना कुणाचेही भय वाटत नसून खुलेआम शस्त्र बाळगण्याचे प्रकार घडत आहे. इतके नव्हे तर काही सराईत गुन्हेगार हे गावठी रिव्हॉल्व्हर घेऊन फिरत असल्याची चर्चा आहे. संघटित गुन्हेगारीची साखळी वाढत असल्यानेच सिडकोत गुन्हेगारी फोफावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिडको, तसेच परिसरात गुन्हेगारांनी डोके वर काढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष करून सिडको भागात रोजच हाणामाऱ्या, भाईगिरीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे असे प्रकार भरवस्तीत घडत असल्याने या भाईगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गणेशोत्सव काळातही दररोज मारामारीचे प्रकार घडत होते.
सिडकोतील वाढती गंडगिरी, गुन्हेगारांच्या आपापसातील वर्चस्वामुळे दररोज कुठेना कुठे मारामाऱ्या होण्याचे प्रकार घडत असून, गुन्हेगारांना खाकीचा वचकच राहिला नसल्याची परिस्थिती बघावयास मिळत आहे. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यावरही सायंकाळच्या सुमारास हल्ला करण्यात आला.
तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या कामगारांना रस्त्यात अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे, तसेच मोबाइल हिसकावण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे कामगार वर्गातही भीतीचे वातावरण पसरले आहे. चार दिवसांपूर्वी मेल्ट्रॉन कंपनीसमोरून रात्रीच्या वेळी घरी जात असलेल्या कामगारासही चोरट्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकारही घडला आहे.
मंगळवारी (दि.२९) रोेजी दत्त चौक परिसरात भरदिवसा परिसरातील दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले व यात एका शाळकरी मुलास दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्याने चाकूचा वार करून जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे गुन्हेगारी किती गंभीर बनली आहे, याबाबतची चर्चा सिडकोत सुरू आहे. एकूणच सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी डोके वर काढले असून, पोलिसांनी याबाबत दक्षता घेण्याची मागणी सिडकोवासीयांनी केली आहे. (वार्ताहर)

 

शाळेच्या गणवेशातच भाईगिरी
विद्यार्थ्यांच्या टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली तेव्हा सर्व विद्यार्थी हे शाळेतील गणवेशामध्येच होते. सदर विद्यार्थी हे घरून शाळेत निघाले, मात्र रस्त्यातच त्यांनी हाणामारी केली. यामुळे पालकांनीदेखील आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

पोलीस गस्त वाढविण्याची गरज
गेल्या काही दिवसांपासून सिडकोत गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या कथित भाईगिरींविरूद्ध कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्यान, चौक, मोकळे भूखंड, पानटपरी, शाळा-कॉलेज परिसरात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

Web Title: Cidcoat school students thump ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.