सिडकोत निवडणुकीचे वातावरण तापले
By Admin | Updated: January 6, 2017 00:24 IST2017-01-06T00:24:12+5:302017-01-06T00:24:28+5:30
हौशी इच्छुकांकडून पोस्टरबाजी; कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस

सिडकोत निवडणुकीचे वातावरण तापले
सिडको : येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीचे वातावरण सिडको भागात तापू लागले असून, मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत असून, आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर विद्यमान नगरसेवकांनी विकासकामांचे लोकार्पण केले, तर इतर इच्छुकांनी प्रभागात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक म्हटली की, इच्छुक उमेदवारांकडून कार्यकर्त्यांची जमवाजमव करत त्यांना खूष करण्यावर भर दिला जातो. सिडकोतही इच्छुकांकडून कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली असल्यामुळे कार्यकर्त्यांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळाले.
येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी सिडको भागातील प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून पत्रके तसेच मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात येत आहे. बहुतांशी प्रभागातील इच्छुकांनी एक ते दोन वेळा पूर्ण प्रभागात फिरून मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. सिडको प्रभागात शिवसेना व भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे.
एका प्रभागात चारपेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असून, यात प्रभाग क्रमांक २९ मध्ये सेनेत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील भागात इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठी उमेदवारी देतील किंवा नाही याची परवा न करता पक्षाच्या माध्यमातून प्रभागात प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. यातच काहींनी तर चार उमेदवारांचे पॅनलदेखील स्वत: निश्चित करत मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली आहे. तर इच्छुक उमेदवारांकडून आपली उमेदवारी निश्चित झाल्याचे मतदारांना सांगत प्रचार केला जात आहे. (वार्ताहर)