जीपच्या धडकेत सिडकोतील युवक ठार
By Admin | Updated: April 24, 2016 00:06 IST2016-04-24T00:03:36+5:302016-04-24T00:06:54+5:30
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जीपच्या धडकेत सिडकोतील युवक ठार
नाशिक : विवाह समारंभासाठी त्र्यंबकेश्वरला मित्रांसमवेत जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीस भरधाव जीपने दिलेल्या धडकेत सिडकोतील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील जव्हाररोड चौकात घडली़ मयत तरुणाचे नाव चेतन ऊर्फ गणेश देवीदास निकम (२५, रा. उत्तमनगर) असे असून, तो महापालिकेच्या सिडको विभागाच्या घरपट्टी कार्यालयातील अधिकारी देवीदास निकम यांचा मुलगा आहे़
विवाह समारंभासाठी चेतन हा मित्रांसमवेत दुचाकीने त्र्यंबकेश्वरला जात होता़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास जव्हाररोड चौकात भरधाव जीपने दुचाकीला धडक दिली़ यामध्ये चेतन गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता़
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून, जीपचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ महापालिकेचे अधिकारी देवीदास निकम यांचा चेतन हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)