पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सिडको बनतेय गुन्हेगारांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:48+5:302021-07-30T04:14:48+5:30
सिडको : गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोसह परिसरात गुन्हेगारी वाढली असून, त्यामुळे गेले अनेक महिने ...

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सिडको बनतेय गुन्हेगारांचा अड्डा
सिडको : गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोसह परिसरात गुन्हेगारी वाढली असून, त्यामुळे गेले अनेक महिने शांत असलेला सिडको परिसर हा पुन्हा गुन्हेगारांचा अड्डा बनवतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अशी भयंकर परिस्थिती असतानाही पोलिसांकडून मात्र संबंधित गुन्हेगारांवर खाकीचा वचक ठेवण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार असून पोलिसांनी वेळीच अशा घटनांना आवर न घातल्यास पुढील काळात पोलिसांबरोबरच नागरिकांना देखील डोकेदुखी ठरू शकते.
मागील आठवड्यात सिडकोतील बडदे नगर ते पाटील नगर या रस्त्यादरम्यान दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने तिघा जणांना बेदम मारहाण केली. यात एक गंभीर जखमी झाला आहे. यातील काही आरोपी अद्यापही पोलिसांना मिळून आलेले नाहीत. ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास स्टेट बँक चौपाटीजवळ असलेल्या सोनाली मटण खानावळीसमोर, नाशिक रोड देवळाली गाव येथील प्रसाद भालेराव या तरुणाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने व खुर्चीच्या साहाय्याने जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मागील आठवड्यात घडलेली घटना व बुधवारी घडलेली घटना या दोन्ही घटना, वेळेचे बंधन पाळत नसल्यानेच आणि अनधिकृत हॉटेलमुळेच घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
मुळात कोरोना महामारीमुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हॉटेलमध्ये न थांबता केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून आदेशित करण्यात आलेले आहे. असे असतानाही पोलिसांचा वरदहस्त असल्याने हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. अंबड पोलीस ठाण्यातील काही पोलिसांच्या हितसंबंधामुळे अनेक हॉटेल्स तसेच ढाब्यांवर रात्री उशिरापर्यंत जेवणाची सुविधा उपलब्ध राहत असल्याची चर्चा होत आहे.
चौकट
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीसह मुंबई-आग्रा महामार्गलगत मुंबई नाका ते विलहोळीदरम्यान असलेली बहुतांश हॉटेल्स ही रात्री देखील सुरू असतात. यात पंचतारांकित हॉटेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉटेल्सचाही समावेश आहे. हे सर्व पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू राहत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे अनेकदा रात्रीच्या वेळी मद्य पिऊन ढाबा तसेच हॉटेलबाहेरच मद्यपींकडून धिंगाणा घालण्याचे प्रकार देखील याआधी अनेकदा घडले आहेत.