टिप्पर गँगच्या सहा जणांवर मोक्कान्वये दोषारोपपत्र
By Admin | Updated: November 16, 2016 01:09 IST2016-11-16T01:12:37+5:302016-11-16T01:09:03+5:30
महासंचालकांची परवानगी : पोलिसांनी गुन्हेगारांची मांडली कुंडली; आणखी काही सराईत रडारवर

टिप्पर गँगच्या सहा जणांवर मोक्कान्वये दोषारोपपत्र
नाशिक : सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगमधील सहा सराईत गुन्हेगारांवर विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात मंगळवारी (दि़ १५) मोक्कान्वये ९५० पानी दोषारोपपत्र तर इतर सात गुन्हेगारांविरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले़ यामध्ये पोलिसांनी या गुन्हेगारांची कुंडलीच मांडली आहे़ दरम्यान, अपर पोलीस महासंचालक एस़ पी़ यादव हे पंचवटीतील परदेशी गँगप्रमाणे मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी देता की नाही याबाबत नागरिकांमध्ये साशंकता होती़
सिडकोतील शुभम पार्कमधील फळविक्रेता शुभम भावसार यास ३१ जून २०१६ रोजी पिस्तुलाचा धाक दाखवून टिप्पर गँगच्या गुन्हेगारांनी पाच लाखांची खंडणीची मागणी केली होती़ तसेच त्याच्या आईवडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करून खिशातील रोकड काढून घेतली होती़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सापळा रचून टिप्परचा शाकीर नासीर पठाण ऊर्फ मोठा पठाण, गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, सोन्या बापू पवार, वसीम शेख, शाहीद सय्यद, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले, देवदत्त तुळशीराम घाटोळे, मुकेश दलपतसिंग राजपूत यास अटक केली होती़
तत्कालीन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशानुसार मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी करून आणखी सहा संशयितांना अटक केली़ त्यामध्ये शासकीय ठेकेदार स्वप्निल गोसावी व सिन्नर तालुक्यातील अमोल जाधव, गोरख वसंत वऱ्हाडे या दोन वाळू व्यावसायिकांचाही समावेश होता़ या प्रकरणी पंचवटीतील सराईत गुन्हेगार व नगरसेवकांचीही चौकशी करण्यात आली होती़
दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. पी. यादव (कायदा व सुव्यवस्था) यांनी मंगळवारी (दि. १५) टिप्परच्या सहा गुन्हेगारांविरोधात मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिली़ तर इतरांविरोधात भादंवि कलमान्वये दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले़ पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या प्रयत्नांमुळेच टिप्परच्या गुंडांवर ही मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे़ (प्रतिनिधी)