बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडी ठार

By Admin | Updated: February 15, 2016 23:33 IST2016-02-15T23:08:15+5:302016-02-15T23:33:31+5:30

अंदरसूल : संगमनेर तालुक्यात घडली दुर्दैवी घटना

Chummeri killed in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडी ठार

 अंदरसूल : येवला तालुक्यातील सायगाव येथील गणेश मनोहर पतंगराव यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर कणोली (ता. संगमनेर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री ८ वाजता घडली.
गुंजन आपल्या आईसोबत दोन दिवसांपूर्वी मामाच्या गावी कणोली, ता. संगमनेर येथे गेली होती. गावाच्या लगतच शेतात मामाचं घर असून, आजूबाजूला उसाची शेती. शुक्र वारी (दि.१२) रात्री ८ वाजता आजोबा भाऊसाहेब वर्पे अंगणात गायीचे दूध काढत होते व गुंजन अंगणामध्ये खेळत होती. अशातच दबक्या पावलांनी येऊन अंगणात खेळणाऱ्या गुंजनची मान पकडून बिबट्या पसार झाला. घरच्यांनी एकच आकांत केला. गावातील तरुणांच्या मदतीने एक तासांच्या शोधमोहिमेनंतर उसाच्या शेतात गुंजनच्या कोवळ्या शरीराचे लचके तोडणारा बिबट्या जमावाला पाहून पसार झाला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गुंजन रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होती. गुंजनला तत्काळ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र गुंजनची प्राणज्योत केव्हाच मावळली होती. रात्री उशिरा १२ वाजता आपल्या गावी सायगाव येथे गुंजनचे शव आणण्यात आले. गुंजनच्या दुर्दैवी निधनाची वार्ता कळताच सायगावकरांसोबत संपूर्ण येवला तालुक्यातील नागरिकांचे हृदय हेलावले. आपल्या बोबड्या बोलाने गावातील शेजाऱ्या-पाजाऱ्यांना वेड लावणाऱ्या गुंजनचे निधन सर्वांनाच चटका लावून गेले. सायगावकरांनी उत्स्फूर्त गावबंद ठेवत गुंजन पतंगराव हिला श्रद्धांजली वाहिली. दिवसभर तालुक्यातील सोशल मीडियातून गुंजनला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शनिवारी (दि.१३) रोजी सकाळी ९ वाजता सायगाव, ता. येवला मूळगावी गुंजनवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Chummeri killed in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.