चौक सुशोभिकरणाला बसला मंदीचा फटका
By Admin | Updated: November 6, 2014 00:23 IST2014-11-05T23:47:57+5:302014-11-06T00:23:11+5:30
प्रायोजकांची माघार : प्रत्यक्ष कामे करण्यास टाळाटाळ

चौक सुशोभिकरणाला बसला मंदीचा फटका
नाशिक : शहरातील चौक सुशोभिकरणासाठी व्यावसायिकांनी विशेषत: बांधकाम व्यावसायिकांनी दाखवलेला उत्साह आता आटला आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सध्या बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याचे निमित्त करून तसे पत्र पालिकेला दिले आहे, तर काही व्यावसायिकांनी पालिकेचे दूरध्वनी घेणेही टाळण्यास प्रारंभ केला आहे.
शहर सुशोभिकरणात व्यावसायिकांचा सहभाग असावा यासाठी महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याला के्रडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने प्रतिसाद दिला आणि तब्बल पस्तीस ते चाळीस चौक सुशोभिकरण करण्याचे ठरविण्यात आले. पालिकेकडे तसा प्रस्ताव देऊन कोणते चौक कोण विकसित करणार याची यादीही तयार करण्यात आली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक तसेच अन्य काही प्रायोजकांना अडचणी येत असल्याने तत्कालीन महापौर अॅड. यतिन वाघ यांच्याकडे बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या आधीच २२ वाहतूक बेटांसाठी भूमिपूजन करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने पाठपुरावा केला; मात्र फारसे यश आले नाही. महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर चाळीसपैकी १७ वाहतूक बेट सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार करारही करण्यात आले; परंतु अनेकांनी हात आखडता घेतला आहे. वीस-चाळीस लाख रुपये खर्च करण्यास टाळाटाळ करण्यात येत असून, बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने सध्या रेडीरेकनरचे दर वाढल्याने व बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याने तूर्तास चौक सुशोभिकरणाचा विषय बाजूला ठेवण्यास सांगितले. अन्य काही व्यावसायिकांनी अशाच प्रकारे तूर्तास शक्य नसल्याचे तोंडी सांगितले आहे. काही व्यावसायिक दूरध्वनी घेण्यासही तयार नसल्याने त्यांची भूमिकादेखील स्पष्ट होणे कठीण झाले आहे. काही मोजकीच प्रकरणे आयुक्तांच्या दरबारी करारासाठी प्रलंबित आहेत.
सध्या खाबिया ग्रुप, संदीप फाउंडेशन, किरण चव्हाण यांच्यासारखे काही मोजकेच व्यावसायिक लक्ष पुरवून चौक सुशोभित करीत आहेत. अन्य व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याने लवकरच याबाबत तड लागावी अन्यथा नवीन प्रायोजक शोधण्याच्या तयारीत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)