म्हसरूळ पोलीस ठाण्यात ‘चॉइस’ पोस्टिंग
By Admin | Updated: January 3, 2016 23:48 IST2016-01-03T23:45:38+5:302016-01-03T23:48:23+5:30
स्वतंत्र पोलीस ठाणे : कामकाज सुरू

म्हसरूळ पोलीस ठाण्यात ‘चॉइस’ पोस्टिंग
पंचवटी : वाढती लोकसंख्या तसेच वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळावे, या हेतूने आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्याचे पुन्हा विभाजन करून आता नव्याने म्हसरूळ पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे.
म्हसरूळ, आडगाव अशा दोन पोलीस ठाण्यांची पंचवटीत भर पडल्याने एकूणच पंचवटीत आता तीन पोलीस ठाण्यांचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच सुरू करण्यात आलेल्या या म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्तालयातील पोलीस मुख्यालय तर कोणी अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतून थेट म्हसरूळ पोलीस ठाण्यात काम करण्यास पसंती दर्शविल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्याला ‘पॉवरबाज’ कर्मचाऱ्यांनी पसंती दिल्याचे बोलले जात आहे.
दिंडोरी रोडवरील मेरी शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी वर्गासाठी तयार करण्यात आलेल्या इमारतीत सध्या पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यासाठी एक स्वतंत्र इमारतच मिळाल्याने ऐसपैस जागा मिळाली आहे.
पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पंचवटीचे गुन्हे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात दोन सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षक, तसेच ६५ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. शासकीय वसाहतीच्या आवारात पोलीस ठाण्याला स्वतंत्र जागा मिळाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मनोमन आनंद व्यक्त केला
आहे. विशेष म्हणजे पूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात काम केलेल्या व सद्यस्थितीत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या निमित्ताने का होईना पुन्हा पंचवटीतच काम करण्याची संधी मिळाल्याने अशा अनेक पॉवरबाज कर्मचाऱ्यांचा ही सुवर्णसंधीच मिळाली आहे. (वार्ताहर)