देशवंडीतील मुलं म्हणतायेत ‘आम्हा गावाचं धन, वामनदादांचं गाणं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST2021-09-04T04:17:59+5:302021-09-04T04:17:59+5:30
आपल्या गीतांच्या आणि कवनांच्या माध्यमातून सामाजिक समतेचा आग्रह धरणारे लोककवी वामनदादा कर्डक यांनी विपुल काव्य लेखन आणि गीत गायन ...

देशवंडीतील मुलं म्हणतायेत ‘आम्हा गावाचं धन, वामनदादांचं गाणं’
आपल्या गीतांच्या आणि कवनांच्या माध्यमातून सामाजिक समतेचा आग्रह धरणारे लोककवी वामनदादा कर्डक यांनी विपुल काव्य लेखन आणि गीत गायन केले आहे. सामाजिक विषमतेच्या अनेक पैलूंवर त्यांनी क्रांतिकारी गीतरचना करीत अनेक गीते अजरामर केली आणि ते लोककवी ठरले. त्यांच्या या कला प्रवासाची नव्या पिढीला ओळख होण्यासाठी त्यांच्या देशवंडी या गावातच आता प्रयत्न सुरू झाले आहेत.
वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र आणि जन्मशताब्दी महोत्सव समिती देशवंडी यांच्या माध्यमातून गावात नव्या अध्यायाला सुरुवात करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना वामनदादांच्या गीतांचा परिचय करून देण्यासाठीची कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. ‘आम्हा गावाचं धन, वामनदादांचं गाणं’ या उपक्रमातून गावातच त्यांच्या गीतांची जपणूक व्हावी आणि त्यांच्या गीतांचे महत्त्व कळावे यासाठीची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. वामनदादांच्या कवितांचा अभ्यास व्हावा, त्यांच्या कवितांचे रसग्रहण करता यावे याबरोबरच नव्या पिढीला त्यांच्या कलासाहित्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी तरुणांना या मोहिमेत जोडले जात आहे. गावातील प्रत्येक घराघरात वामनदादांचे गीत गुणगुणले जाईल या निर्धाराने त्यांच्या गीतांचे बीजारोपण नव्या पिढीसमोर केले जात आहे.
-- इन्फो--
साहित्य-सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून लेखन, गायन आणि सादरीकरण करण्याची कला येथील तरुणांना शिकविली जाणार आहे. वामनदादांची विविध विषयांवरील कविता आणि गायन हा प्रमुख विषय त्यामध्ये असणार आहे. गावातील हीच तरुण मुले घराघरात वामनदांदांच्या गीतांचे सोनं पाेहोचवतील, अशी पिढी घडविण्याचा मूळ उद्देश या मोहिमेचा आहे.
--कोट--
वामनदादांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, पर्यावरण, कुटुंबव्यवस्था, स्त्रियांचे सामाजिक प्रश्न आणि सामाजिक चळवळीवर आपले विचार गीताच्या माध्यमातून मांडले आहेत. लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी असंख्या विषयावर दादांनी काव्य लेखन आणि गीत गायन केले आहे. त्यांचाच गावात त्यांच्या गीतांचा वारसा पुढे चालविला जावा यासाठी गीत परिचय, रसग्रहण, सादरीकरण, संगीत बांधणी याविषयी गावातील तरुण-तरुणींना प्रशिक्षण दिले जात आहे.
- शरद शेजवळ, संस्थापक कार्याध्यक्ष लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान