ठाणापाडा येथे मातेसह मुलांची आत्महत्त्या
By Admin | Updated: June 26, 2017 00:45 IST2017-06-26T00:45:02+5:302017-06-26T00:45:19+5:30
नाशिक : पतीच्या आत्महत्येस चार महिने पूर्ण होत नाही तोच पत्नीने आपल्या मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे रविवारी (दि़२५)उघडकीस आली़

ठाणापाडा येथे मातेसह मुलांची आत्महत्त्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पतीच्या आत्महत्येस चार महिने पूर्ण होत नाही तोच पत्नीने आपल्या दहा व बारा वर्षांच्या मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे रविवारी (दि़२५) दुपारच्या सुमारास उघडकीस आली़ हौसाबाई गिरीधर लोखंडे (वय ३६), मुलगा नीरज गिरीधर लोखंडे (वय १२) व मुलगी माधुरी गिरीधर लोखंडे (वय १०) अशी आत्महत्या केलेल्या आई आणि मुलांची नावे आहेत. दरम्यान, जमिनीच्या हव्यासापोटी चुलत सासऱ्यांनी व दिरांनी घातपात केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या वडिलांनी केला आहे़
हरसूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणापाडा येथील हौसाबाई लोखंडे व तिच्या दोन लहान मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिळाली़ त्यानुसार हरसूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक एम़ बी़ घुगे हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले़ मयत हौसाबाई लोखंडे यांचे वडील जयराम बाळू धनवले (रा़ चिखलपाडा, ता़ त्र्यंबकेश्वर, जि़ नाशिक) यांनी ही आत्महत्त्या नसून घातपाताचा आरोप केला आहे़ चार महिन्यांपूर्वीच हौसाबाईचा पती गिरीधर लोखंडे याने आत्महत्त्या केली होती़ यानंतर या मुलांसाठी शालेय साहित्य तसेच अडीच हजार रुपये त्यांनी दिले होते़ हौसाबाईचे चुलत सासरे व दीरांनी दहा एकर जमिनीसाठी मुलगी व तिच्या दोन मुलांचा घातपात केल्याचा आरोपही धनवले यांनी केला आहे़ दरम्यान, या तिघांच्या आत्महत्त्येचे कारण समजले नसून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे़ या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
आत्महत्त्या नव्हे खूनच
मुलगी व तिच्या दोन्ही मुलांनी गळफास घेतलेली जागा अरुंद तसेच दोरीही कमकुवत होती़ मुलीचा मृतदेह तर अक्षरश: गुडगे खाली टेकलेल्या अवस्थेत होता़ तसेच पायाखालील कांदेही तसेच होते़ गळफास घेणारा माणूस किमान हातपाय तरी झाडतो व त्यामुळे घरातील कांदे इतरत्र पसरायला हवे होते मात्र कांदे तसेच पडलेले होते व अंतरही कमी होते़ त्यामुळे हा आत्महत्त्येचा नाही तर खूनाचा प्रकार आहे़ जमिनीच्या कारणावरून तिच्या चुलत सासरच्यांनीच हा प्रकार केला आहे़ पोलिसांनी योग्य तपास करून न्याय द्यावा़ (फोटो :- २५ ठाणापाडा सुसाईड २ या नावाने सेव्ह केला आहे)
- जयराम धनवले, आत्महत्त्या केलेल्या महिलेचे वडील़
शवविच्छेदन अहवालानंतर निर्णय
ठाणापाडा येथील घरामध्ये या तिघांचेही गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले असून ते शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत़ प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल़
- एस़एस़वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पेठ़