मुख्यमंत्री घेणार आदिवासी उपयोजनेच्या निधीचा आढावा
By Admin | Updated: November 11, 2015 00:08 IST2015-11-11T00:07:51+5:302015-11-11T00:08:22+5:30
उत्तर महाराष्ट्र : सोमवारी मंत्रालयात बैठक

मुख्यमंत्री घेणार आदिवासी उपयोजनेच्या निधीचा आढावा
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे व नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात वितरित करण्यात आलेला आदिवासी उपयोजनेचा निधी व त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१६) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक बोलविण्यात आल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी आदिवासी उपयोजनेतून करण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन लाखांच्या मोऱ्या बांधकामाबाबत तक्रारीचे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना देऊन या मोऱ्यांच्या झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गरज नसताना तीन लाख रुपयांच्या आतील मोऱ्यांची निकृष्ट दर्जाची कामे करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यातच आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एकत्रित बैठक घेणार असून, आदिवासी उपयोजनेतील कामांचा आढावा घेणार आहेत. (प्रतिनिधी)