संचालक मंडळ भेटणार मुख्यमंत्र्यांना

By Admin | Updated: October 23, 2016 00:26 IST2016-10-23T00:25:47+5:302016-10-23T00:26:33+5:30

जिल्हा बॅँक : गणपूर्तीची साशंकता कायम

Chief Minister to meet Board of Directors | संचालक मंडळ भेटणार मुख्यमंत्र्यांना

संचालक मंडळ भेटणार मुख्यमंत्र्यांना

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या इतिहासात शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपास निधी नसल्याची वेळ पहिल्यांदाच जिल्हा बॅँकेवर आली असून, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी ३०० कोटींचा कर्ज प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा, यामागणीसाठी जिल्हा बॅँकेचे सर्वपक्षीय संचालक मंडळ रविवारी (दि.२३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
शनिवारी (दि.२२) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. मात्र बैठकीच्या गणपूर्तीची पुन्हा शंका कायम असल्याचे चित्र आहे. उपस्थित संचालकांनी गणपूर्ती झाल्याचा दावा केला आहे, तर अनुपस्थित संचालकांनी आवश्यक ११ संचालकांची गणपूर्ती झालीच नसल्याचा दावा कायम ठेवला आहे. दुपारी २ वाजता बोलविलेली बैठक सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालीच नसल्याचा दावा अनुपस्थित संचालकांनी केला आहे, तर बैठकीस उपस्थित संचालकांनी या बैठकीत सर्वपक्षीय संचालक मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राज्य शिखर बॅँकेकडे पाठविण्यात आलेला महिनाभरापूर्वीच्या ३०० कोटींच्या कर्ज प्रस्तावाबाबत चर्चा करून ते कर्ज राज्य शिखर बॅँकेला जिल्हा बॅँकेला तातडीने देण्याबाबत विनंती करायची, असे सांगितले आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांची मुंबईला भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले.
विशेष म्हणजे रविवारी (दि.२२) भाजपाचा शिर्डीला मेळावा होत असून, या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने शिर्डीला जाऊन संचालक मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे समजते. तसेच ४७ कोटींचे सरकारकडे थकीत पुनर्गठणाचे पैसेही जिल्हा बॅँकेला तातडीने द्यावे, अशी मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या बैठकीस अध्यक्ष नरेंद्र दराडे, उपाध्यक्ष सुहास कांदे, संचालक परवेज कोकणी, किशोर दराडे, गणपतराव पाटील यांच्यासह १३ संचालक उपस्थित असल्याचा दावा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister to meet Board of Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.