नाशिक : महापालिकेच्या वतीने सफाईच्या कामांसाठी आउटसोर्सिंग अन्य खासगीकरणातून कामे करू नये यासाठी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे.महापालिकेच्या वतीने स्वच्छतेची कामे करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी आउटसोर्सिंगद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेच्या महासभेनेच संमती दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यास वाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने कडाडून विरोध करण्यात आला आहे. महापालिकेत सफाई कामगारांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघटना करीत आहे. लोकप्रतिनिधीही तशी मागणी करीत आहे. केवळ शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते. पालिकेचा आस्थापना खर्च वाढू नये यासाठी आउटसोर्सिंगचे नाव पुढे केले जाते प्रत्यक्षात ठेकेदाराला देणाऱ्या देयकाचा खर्चदेखील आस्थापना खर्चातच नमूद केला जातो. त्यामुळे महापालिकेची बचत होत नाही. आज समाजात अनेक युवक केवळ भरतीच्या प्रतीक्षेत असून, त्यांना कोणत्याही प्रकारे रोजगाराची संधी नाही त्यापार्श्वभूमीवर खासगीकरणाऐवजी मानधनावर भरती करण्याची परवानगी द्यावी, असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेशकुमार ढकोलिया, जिल्हाध्यक्ष अनिल बहोत, महासचिव सोनू कागडा, सतीश टाक यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
‘आउटसोर्सिंग’विरोधात मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:26 IST