‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा,
By Admin | Updated: March 9, 2015 00:52 IST2015-03-09T00:45:02+5:302015-03-09T00:52:06+5:30
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा,

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा,
नाशिक : ‘जय भवानी..जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा, गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर जोडीला डिजेचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि यामध्ये बेभान होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात शिवजयंती मिरवणूक पार पडली.पारंपरिक मार्ग वाकडी बारव येथून महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. अकरा शिव मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यातील तीन मंडळांनी जिवंत देखावा सादर केला, तर जवळपास सर्वच मंडळांनी डिजेच्या तालावर तरुणाईला थिरकण्यास भाग पाडले. या मिरवणुकीच्या प्रारंभी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चित्ररथ होता़ त्यापाठोपाठ शिवसाई फ्रेंड सर्कल, लष्कर-ए-शिवबा ग्रुप, स्वराज्य प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन पक्ष, शहीद भगतसिंग क्रांती दल, नगरसेवक विनायक पांडे यांचे शिवसेवा मित्र मंडळ, माजी आमदार वसंत गिते यांचे मुंबई नाका युवक मित्रमंडळ, नगरसेवक सचिन मराठे यांचे अर्जुन क्रीडा मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, आत्मविश्वास व्यायामशाळा, असे अकरा चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते़ दुपारी साडेचारपासून सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, न्यायालयाच्या नियमाप्रमाणे रात्री १० वाजता पोलिसांनी सर्व वाद्ये बंद करण्यात केली़ यानंतर मिरवणूक शांततेत मार्गस्थ झाली. वाकडी बारव, भद्रकाली, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजामार्गे पंचवटी असा मिरवणुकीचा मार्ग होता.
पोलीस उपआयुक्त वारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली व पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, रात्री १० वाजता वाद्य बंद केल्यानंतर कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तर काही मंडळांचे चित्ररथ हे माघारी फिरले. (प्रतिनिधी)