सेनेच्या मेळाव्यात इच्छुकांची चाचपणी
By Admin | Updated: October 22, 2016 22:54 IST2016-10-22T22:53:38+5:302016-10-22T22:54:27+5:30
रणशिंग फुंकले : पक्षहिताला प्राधान्य देत भगवा फडकविण्याचे आवाहन

सेनेच्या मेळाव्यात इच्छुकांची चाचपणी
सिन्नर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे इच्छुक उमेदवार व शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला. शिवसेना नेत्यांनी इच्छुक व कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेताना त्यांना पक्षहितासाठी प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. पक्षाच्या हितासाठी जो दोन पावले मागे घेतो तोच खरा शिलेदार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगून स्वच्छ कारभारासाठी शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकविण्याचे आवाहन केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास संपर्कप्रमुख संजय बच्छाव, आमदार राजाभाऊ वाजे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, हेमंत वाजे, उदय सांगळे, चंद्रकांत वरंदळ, तालुकाप्रमुख दीपक खुळे, अरुण चव्हाणके, नामकर्ण आवारे, राजेश गडाख, हेमंत नाईक आदिंसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पालिका निवडणूक म्हणजे अवघड वळण असल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी जनतेने जो विश्वास दाखविला त्याची परीक्षा घेणारा हा काळ असल्याचे ते म्हणाले. त्यात उत्तीर्ण होतो की नाही हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. इच्छुकांची संख्या जास्त आहे. सर्वांना उमेदवारी देणे शक्य नाही. उमेदवारी मिळणार नाही तो थांबेल त्याचे आपल्यावर व पक्षावर उपकार होतील. थांबणाऱ्यांचा योग्य सन्मान राखून त्याला न्याय देण्याचे आश्वासन वाजे यांनी दिले. पैसे कमविण्यासाठी पालिकेत जाऊ नका. ज्याची कष्ट करून घाम गाळण्याची तयारी आहे अशांनाच उमेदवारी दिली जाईल. मी खात नाही आणि कोणाला खावू देणार नाही या भूमिकेतून आपण यापुढेही काम करणार असल्याचे वाजे यांनी सांगितले.
या शहरात राहणाऱ्यांना पालिका चालवायची आहे. बाहेरून येणाऱ्यांचे ऐकू नका. आपले लोक आपली पालिका या भूमिकेतून आदर्शवत पालिका करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन वाजे यांनी केले. निष्ठेने रहा. पक्ष कलंकित होईल असे काम करू नका, असे आवाहन जिल्हाप्रमुख करंजकर यांनी केले. एका बाजूला भ्रष्टाचारी तर दुसऱ्या बाजूला राजाभाऊ वाजे यांच्यासारखे सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आहेत. त्यामुळे शिवसेना देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन उदय सांगळे यांनी केले. यावेळी कृष्णाजी भगत, किरण कोथमिरे, कृष्णा कासार, गोविंद लोखंडे, अॅड.एन.एस. हिरे, जगन्नाथ खैरनार, चंद्रकांत वरंदळ, निवृत्ती जाधव, संजय चव्हाणके यांनी मनोगत व्यक्त केले. इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज भरून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी राहुल बलक, डॉ. जी. एल. पवार, जगन्नाथ पवार, बाजीराव बोडके, सोमनाथ तुपे, इलियास खतीब, विजय जाधव, शैलेश नाईक, सुधीर रावले, पिराजी पवार, प्रकाश कदम, नारायण वाजे, अनिल सांगळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)