बसस्थानकाला विळखा

By Admin | Updated: November 8, 2015 23:30 IST2015-11-08T23:29:41+5:302015-11-08T23:30:32+5:30

महामार्ग बसस्थानक : खासगी प्रवासी बसेस आणि विक्रेत्यांचे अतिक्रमण

Check the bus station | बसस्थानकाला विळखा

बसस्थानकाला विळखा

नाशिक : शहरातील सर्वांत गजबजलेला परिसर म्हणजे महामार्ग बसस्थानक. या स्थानकाच्या समोरच उभ्या राहणाऱ्या खासगी बसेस, रिक्षा-टॅक्सी थांबा आणि हातगाडी विक्रेत्यांचे अतिक्रमण यामुळे सदर रस्ता धोकादायक बनला आहे. येथील हॉटेल्स आणि दवाखान्यांमध्ये येणारे लोक आपली वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने वाहतूककोंडीत आणखीच भर पडते. पालिकेने महामार्ग स्थानकासमोरील अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न करूनही परिस्थिती अद्यापही बदललेली नाही.
काही दिवसांपूर्वी महापालिकेने अतिक्रमण हटविले होते; परंतु विक्रेत्यांनी पुन्हा एकदा महामार्ग स्थानकाला विळखा घातल्याने स्थानकाला ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग बसस्थानकावरून मुंबई, कसारा, नगर, शेवगाव, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, शिरूर येथून बसेस सोडल्या जातात. त्यामुळे या स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. मुंबई नाका हा शहरातील वर्दळीचा चौक असून, दररोज हजारो वाहने येथून ये-जा करीत असतात.
मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकाच्या बाहेरील बाजूस टॅक्सी आणि रिक्षास्टॅण्ड आहे, तर आत येणाऱ्या प्रवेशद्वाराजवळच अनेक दुचाकी उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे स्थानकात बसेस शिरताना अनेक अडचणी येतात. स्थानकाच्या दोन्ही बाजूने प्रचंड अतिक्रमण झाल्यानंतर महापालिकेने येथील अतिक्रमण हटवून रस्ता रुंद केला होता. रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर चौकाने मोकळा श्वास घेतला होता; परंतु आता पुन्हा एकदा विक्रेत्यांनी हळूहळू विक्रेते रस्त्यावर दुकाने थाटून अतिक्रमण करीत आहेत.
या ठिकाणी पुन्हा विक्रेते दिसू लागल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेने वेळीच येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होऊ लागली आहे. महामार्ग बसस्थानकालगत त्या टॅक्सी स्टॅण्डकडील प्रवेश मार्गावर हळूहळू वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. खासगी वाहने तसेच काही विक्रेत्यांच्या चारचाकी गाड्या उभ्या राहत आहे.
दरम्यान, महामार्ग बसस्थानक प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर वाहतूक बेट उभारण्यात यावे, अशीदेखील मागणी होत आहे. पोलीस प्रशासनाने या चौकात दोन ते तीन
वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Check the bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.