स्वस्तात भोजन, प्रवास आणि फुकटात गॅस लायटर !
By Admin | Updated: February 21, 2017 00:57 IST2017-02-21T00:57:06+5:302017-02-21T00:57:19+5:30
हटके फंडे : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योजना

स्वस्तात भोजन, प्रवास आणि फुकटात गॅस लायटर !
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनानाचे प्रयत्न सुरू असतानाच अनेक खासगी संस्था, व्यावसायिक आस्थापनाही पुढे सरसावल्या आहेत. त्यातून स्वस्तात भोजन आणि प्रवास करण्याबरोबरच फुकटात लायटर मिळण्याची व्यवस्था आहे. या शिवाय एका वैद्यकीय संस्थेने एमआरआय आणि सीटी स्कॅन यावर दहा टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. मतदाना हे राष्ट्रीय कर्तव्य असले तरी साधारणत: मतदानापेक्षा त्यादिवशी मिळालेली सुट्टी आनंदात घालविण्यावर कल असतो. मतदान नाही केले तर काय होते? असा प्रश्न करून सहलीवर जाणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक असते. त्यामुळे मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे यासाठी निवडणूक आयोग आणि नाशिक महापालिका यांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार जनजागृती फेऱ्याही काढण्यात आल्या. त्यानंतर आता अनेक सेवाभावी संस्था आणि खासगी व्यावसायिकही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उतरले आहेत. नाशिक जिल्हा हॉटेल असोसिएशनने मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून भोजनाच्या बिलात दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी मतदान केल्याबद्दल बोटावरील शाई दाखवावी लागणार आहे. नाशिकमध्ये टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीने मतदारांना मतदानासाठी जायचे असल्यास प्रवासी भाड्यात काही प्रमाणात सवलत देणार असल्याचे जाहीर केले आहे, तर पंचवटीतील अमृतधाम येथील बाफणा बाजारच्या संचालकांनी व्होट करा, बोट दाखवा आणि कुटुंबासाठी एक गॅस लायटर फुकटात मिळवा, अशी योजना जाहीर केली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी शिक्षित मतदारांनीही कमी मतदान केल्याने त्यांनी ही योजना सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात जाहीर केली आहे. नाशिकच्या एका एकपडदा चित्रपट गृहात तर मतदान केल्यानंतर मतदाराने पुरावा सादर केल्यास चित्रपटाच्या तिकिटदरात २० टक्के सवलत देण्याचे संबंधितांनी जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)