शिक्षण समितीवर ‘चव्हाणराज’

By Admin | Updated: August 7, 2015 23:48 IST2015-08-07T23:25:04+5:302015-08-07T23:48:01+5:30

बिनविरोध निवड : सभापतिपदी संजय चव्हाण, उपसभापती गणेश चव्हाण

'Chavan Raj' on education committee | शिक्षण समितीवर ‘चव्हाणराज’

शिक्षण समितीवर ‘चव्हाणराज’

नाशिक : महापालिका शिक्षण समितीवर आता पुढील दीड वर्ष ‘चव्हाणराज’ राहणार असून, सभापतिपदी महाआघाडीचे उमेदवार व अपक्ष गटनेते संजय चव्हाण आणि उपसभापतिपदी मनसेचे गणेश चव्हाण यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली आहे. शिक्षण समितीसाठीही मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांची एकी कायम राहिल्याने बहुमतामुळे सेना-भाजपा युतीच्या उमेदवारांनी पराभवाचा शिक्का माथी मारून न घेता माघार घेणे पसंत केले.
सरकारचा हस्तक्षेप आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेली शिक्षण समितीची निवडणूक अखेर उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर शुक्रवारी घेण्यात आली. स्थायी समितीच्या दालनात अपर आयुक्त आर. जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सभापती-उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. ११ वाजेपूर्वीच सत्ताधारी मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि अपक्ष सदस्य सभागृहात विराजमान झाले होते. त्यानंतर सेना-भाजपाच्या सदस्यांचे आगमन झाले.
प्रारंभी सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. अर्ज छाननीनंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या हर्षा बडगुजर, भाजपाच्या ज्योती गांगुर्डे यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने महाआघाडीचे उमेदवार संजय चव्हाण यांची सभापतिपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून निवडीचा आनंद व्यक्त केला.
उपसभापतीपदासाठीही सेनेच्या हर्षा बडगुजर, भाजपाच्या ज्योती गांगुर्डे आणि कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी माघार घेतल्याने मनसेचे गणेश चव्हाण यांचीही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. महाआघाडीकडे संजय चव्हाण यांचेसह मनसेचे गणेश चव्हाण, विशाल घोलप, मीना माळोदे, अर्चना जाधव, रेखा बेंडकुळे, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे व योगिता अहेर, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, उषा अहिरे व सुनीता निमसे यानुसार ११ संख्याबळ होते तर विरोधी गटाकडे सेनेच्या हर्षा बडगुजर, नंदिनी जाधव आणि मंगला आढाव व भाजपाच्या ज्योती गांगुर्डे आणि सिंधू खोडे याप्रमाणे ५ इतके संख्याबळ होते. बहुमताचा अंदाज अगोदरच आल्याने सेना-भाजपा युतीच्या उमेदवारांनी माघार घेणे पसंत केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Chavan Raj' on education committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.