चव्हाण यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
By Admin | Updated: July 30, 2016 01:22 IST2016-07-30T01:18:19+5:302016-07-30T01:22:06+5:30
प्रवासी गाड्या : मनमाड, नांदगाव, निफाड, लासलगाव येथील समस्यांबाबत चर्चा

चव्हाण यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
मनमाड : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन मनमाड, नांदगाव, निफाड, लासलगाव या भागातील रेल्वे संदर्भातील विविध समस्यांवर चर्चा केली. नांदगाव, न्यायडोंगरी, लासलगाव, निफाड आदि रेल्वे स्थानकांवर प्रवासी रेल्वे गाड्यांच्या थांब्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. या मतदारसंघातील न्यायडोंगरी स्टेशनजवळच श्रीक्षेत्र नस्तनपूर हे शनिदेवांचे मोठे देवस्थान असून, या ठिकाणी भाविकांच्या मागणी नुसार पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा त्याच बरोबर नांदगाव व निफाड रेल्वे स्थानकावर स्थानिक प्रवासी संघटना व नागरिकांच्या मागणी नुसार पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस (११०२५/११०२६) तसेच लासलगाव रेल्वे स्थानकावर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार कामयानी एक्सप्रेस (११०७१/११०७२) आणि नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस या प्रवासी गाड्यांना थांबा कसा आवश्यक आहे याचे महत्व खासदार चव्हाण यांनी विशद केले. या बैठकीत खासदार चव्हाण यांच्या समवेत रतन चावला हे उपस्थित होते. या बैठकीत मनमाड, नाशिक, नांदगाव, निफाड, लासलगाव या भागातील विविध रेल्वे संदर्भातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. वरील सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी या पूर्वी रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या निवेदनाचे स्मरण करून देण्यात आले. या भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी , नोकरदार, व सर्वसामान्य प्रवासी या गाडयांना थांबा मिळाल्यास कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो रेल्वे च्या आर्थिक उत्पनातं देखील वाढ होऊ शकते त्याच बरोबर ग्रामीण भागातील जनतेची जोडणी नाशिक महानगराकडे झाल्याने या भागाचा झपाट्याने विकास होण्यास मदत होईल असे खासदार चव्हाण यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. दिंडोरी मतदार संघातील प्रवाश्याना वरील
थांबा मिल्यालास विदर्भ, मराठवाडा व उत्तर भारतात तसेच मुंबईकडे जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे. (वार्ताहर)