भात, भगर व्यवसायाला विजेच्या लपंडावाने फटका
By Admin | Updated: August 9, 2016 22:32 IST2016-08-09T22:31:51+5:302016-08-09T22:32:44+5:30
घोटी : ग्रामिण भागात वीज वितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

भात, भगर व्यवसायाला विजेच्या लपंडावाने फटका
घोटी : तांदूळ, मुरमुरा आणि भगर उत्पादनात संपूर्ण राज्यात अग्रेसर असलेल्या घोटी शहरातील या व्यवसायाला वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे घरघर लागली आहे. केवळ तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करीत शहराचा वीजपुरवठा सलगपणे आठ आठ तास बंद ठेवण्यात येत असल्याने शहरातील नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
घोटी शहरात वीज वितरणाकडे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष, अपुरे मनुष्यबळ यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. दरम्यान, घोटी शहरात विजेच्या तारा, खांब पावसाळ्यापूर्वी न बदलल्याने याचा फटका वीज ग्राहकांना ऐन पावसाळ्यात बसत आहे. तसेच या खंडित वीजपुरवठ्याचा परिणाम शहरातील लघुउद्योगावर झाला असून, विजेवर अवलंबून असणारे सर्व लघुउद्योग ठप्प झाल्याने या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शहराबरोबर ग्रामीण भागातही वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. शहराचा व ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे शहरातील उद्योग ठप्प झाले असून, आर्थिक उलाढाल मंदावली आहे. (वार्ताहर)