देयकांमध्ये शुल्कवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:20 IST2017-08-04T23:28:34+5:302017-08-05T00:20:59+5:30
वीज वितरण कंपनीच्या वीज आकार देयकांमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. वीज वितरण कंपनी ग्राहकांची सर्रास लूट करीत आहे.

देयकांमध्ये शुल्कवाढ
मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या वीज आकार देयकांमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. वीज वितरण कंपनी ग्राहकांची सर्रास लूट करीत आहे.
वीज ग्राहकांच्या वीज वापराची माहिती दरमहा मीटर वाचन करून मासिक आकार देयके देऊन पैसे वसूल केले जातात. वीज देयकांमध्ये स्थिर आकार, प्रतिजोडणी, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क आदी छुप्या करांची आकारणी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वीजबिलांच्या रकमांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.
१ एप्रिल २०१७ पासून वीज वापराचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. घरगुती वीज वापरासाठीचा दर युनिटच्या टप्प्यांवर अवलंबून असतो. विजेचा वापर पहिल्या शंभर युनिटच्या आत असेल तर वीजबिल वाजवी येते. परंतु वीज वापर शंभर युनिटच्या पुढे गेला तर मात्र वीज युनिटचा दर दुपटीहून जास्त आहे. याशिवाय इतर छुपे कर लावले जातात. त्यामुळे वीजबिलांची रक्कम ग्राहकांना न परवडणारी आहे. घरगुती वीजवापर ग्राहकांसाठी दरानुसार वापर युनिटवर विजेची आकारणी होते. परंतु याव्यतिरिक्त स्थिर आकार ६० रुपये प्रतिजोडणी महिना, वहन आकार १.२१ रुपये प्रतियुनिट, वीज शुल्क आकार १६ टक्के, इंधन समायोजन आकार आदी छुप्या करांची आकारणी करून वीज ग्राहकांची लूट केली जात आहे. महावितरण ग्राहकांच्या वीज वापर मीटरचे रीडिंग (वाचन) खासगी एजन्सीकडून केले जाते. वीज मीटर रीडिंग एजन्सीवर महावितरण कंपनीचे नियंत्रण राहिलेले नाही. कायद्याने ३० दिवसांचे वीजबिल देणे बंधनकारक असूनही महावितरणकडून वीज ग्राहकांना दोन महिन्यांचे, रीडिंग उपलब्ध नाही, सरासरी वीज देयके अशी वितरण कंपनी व मीटर रीडिंग एजन्सीच्या सोयीनुसार वीज देयके तयार करून रक्कम वसूल केली जाते. तसेच वीज देयके ग्राहकांना घरपोच देताना निष्काळजीपणा होत आहे.