प्रभारी तरीही फुल अधिकारी
By Admin | Updated: January 10, 2017 01:24 IST2017-01-10T01:24:15+5:302017-01-10T01:24:31+5:30
प्रशासकीय उदासीनता : विद्यापीठाचा कारभार तात्पुरत्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन

प्रभारी तरीही फुल अधिकारी
संदीप भालेराव नाशिक
आरोग्य विज्ञान विद्यापीठातील महत्त्वाची पदे गेल्या काही वर्षांपासून प्रभारीच असून, संपूर्ण विद्यापीठाचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावरच सुरू आहे. विशेष म्हणजे प्रभारी पदांचे अधिकार मर्यादित असतानाही येथे मात्र प्रभारी अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार बहाल करण्यात आले आहेत. कुलगुरू सोडले तर इतर महत्त्वाची पदे प्रभारी आहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मनुष्यबळ आणि येथील कामाचा ताण यामुळे विद्यापीठाच्या विभाजनासारखा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही विद्यापीठाने यातून कोणताच धडा घेतला नसल्याचे दिसते. विद्यापीठाचा कारभार हा फंडातील कर्मचारी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांवरच सुरू असल्याचे खुद्द येथील अधिकारीच सांगत असताना महत्त्वाची पदेदेखील भरली जात नाही. प्रभारी अधिकाऱ्यांवरच कारभार करण्यास येथील प्रशासनाला रस असल्याचे दिसते.
विद्यापीठात सध्या कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी, विद्यार्थी कल्याण विभाग, क्रीडा संचालक, यूजी फॅकल्टी ही सारी पदे प्रभारी अधिकारीच सांभाळत आहेत. परीक्षा नियंत्रकांकडे कुलसचिवपदाचा ‘महत्त्वाचा’ कारभार असल्याने परीक्षा विभागाचा कारभार त्या विभागातील सहायक कुलसचिव दर्जाचे अधिकारी पाहत आहेत. त्यामुळे परीक्षा नियंत्रक पदाचा कारभारही त्रयस्थ व्यक्तीच पाहत असल्याचे चित्र आहे. वित्त व लेखा अधिकाऱ्याचे पद हे तर पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रभारीच आहे. सक्षम उमेदवार मिळत नसल्याने सदर पद हे प्रभारी ठेवण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या पदासाठी जाहिरातच काढण्यात आलेली नाही. वास्तविक विद्यापीठ नियमाप्रमाणे कोणतेही पद हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रभारी ठेवता येत नाही. असे असतानाही विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोरदेखील भरतीच्या जाहिरातीचा विषय काढण्यात आलेला नाही. याचाच अर्थ विद्यापीठाला सदर पदे ही प्रभारीच ठेवण्यात रस आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. गेल्या सात महिन्यांपासून कुलसचिवपदावर प्रभारी अधिकारी काम करीत आहेत, तर वित्त अधिकारीही प्रभारी असल्याने आर्थिक विषयांशी संबंधित महत्त्वाची कामे ही दोन्ही प्रभारी अधिकारी पाहत आहेत.
पदांच्या बाबतीत शासनाशी लढा देऊन विद्यापीठासाठी पदे मंजूर करून आणल्याचे श्रेय कुलगुरूंसह कुलसचिव घेत आहेत. मात्र पदे भरण्याची तत्परता दाखविली जात नाही. शासन याबाबत नियमावली तयार करीत असून, शासनाकडूनच विलंब होत असल्याचे विद्यापीठाकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाकडूनच पदे भरण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे स्मरणपत्र विद्यापीठाला देण्यात आल्याचे समजते. वैद्यकीय शिक्षण विभागाने ९ जून २०१६ रोजी ८३ पदे भरण्यास मंजुरी दिलेली आहे. मात्र दहा गेल्या सात महिन्यांपासून विद्यापीठाने पदे भरण्यासाठीची जाहिरातच दिलेली नाही.
(क्रमश:)