मतदारांना गृहीत धरणाऱ्या कॉँग्रेसला चपराक
By Admin | Updated: February 24, 2017 23:49 IST2017-02-24T23:49:20+5:302017-02-24T23:49:40+5:30
भाजपाला नाकारले : नोटाबंदी विरोधातील नाराजी मतपेटीतून व्यक्त

मतदारांना गृहीत धरणाऱ्या कॉँग्रेसला चपराक
एस़आऱ शिंदे : पेठ
तालुक्याच्या राजकारणावर घट्ट पकड असलेल्या शिवसेनेच्या हातातून जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता हस्तगत करण्यासाठी माकपाने केलेली व्यूहरचना कामी आली नसली तरी पेठच्या भगव्या वादळाशी कडवी झुंज देत लाल बावटा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. तालुक्यात भाजपाला साफ नाकारण्यात येऊन मतदारांना गृहीत धरणाऱ्या कॉँग्रेसची पीछेहाट झाली आहे. यावेळी पेठ तालुक्यात शिवसेनेने दोन गट व चार गणांवर विजय संपादन करीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. तालुकाप्रमुख भास्कर गावित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तालुक्यात तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करून त्या माध्यमातून सहाही जागावर भगवा फडकवत इतर सर्वच पक्षांना धोबीपछाड दिली. प्रतिष्ठेच्या धोंडमाळ गटातून शिवसेनेची अपेक्षेप्रमाणे माकपाशी टक्कर झाली. मागील निवडणुकीत या गटात राष्ट्रवादी दोन नंबरला असताना यावेळी आमदार पुत्र इंद्रजित गावित यांनी उमेदवारी केल्याने माकपाच्या बाहुतील बळ वाढले. भास्कर गावित दोन हजाराच्या फरकाने निवडून आले. तर माकपाच्या इंद्रजित गावित यांना मिळालेल्या ७६४४ मतांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी या गटात तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. कोहोर गटात शिवसेना व मनसे या दोघांमध्ये सरळ सामना होईल असे वाटत असताना किंबहुना मनसे मागील निकालाची पुनरावृत्ती करेल, अशी परिस्थिती असताना राष्ट्रवादीनेही मनसेबरोबर मते मिळवल्याने हा सामना तिरंगी झाला. शिवसेनेच्या विद्यमान सदस्य हेमलता गावीत दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. मध्यंतरी झालेल्या पोटनिवडणूकीत निसटता पराभव स्विकाराव्या लागलेल्या मनसेच्या देवता राऊत यांनी कडवी झुंज दिली. मनसेची कोहोर गटावरील पकड अधिक घट्ट झाल्याचे या गटातून दिसून आले. फारसा प्रभाव नसतांनाही तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत यांचा जनसंपर्क प्रत्यक्ष मतपेटीत उतरल्याचे दिसून आले तर राष्ट्रवादीच्या कविता चौधरी यांनी तिसऱ्या क्र मांकाची मते मिळवली. एकीकडे देशात व राज्यात तसेच महानगरपालिका क्षेत्रात भाजपाचा वारू सुसाट वेगाने दौडत असतांना आदिवासी पेठ तालुक्यात मात्र मतदारांनी साफ नाकारल्याचे दिसून आले. भाजपाच्या गटातील उमेदवारांना दोन हजाराच्या आत तर गणातील उमेदवारांना एक हजाराच्या आत समाधान मानावे लागले. नोटबंदीचा निर्णय शहरी भागात कमालीचा यशस्वी झाला असला तरीही ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेने या निर्णयाची नाराजी मतपेटीतून व्यक्त केल्याचे दिसून आले.
एकेकाळी माजी दिवंगत खासदार सिताराम भोये यांच्या नेतृत्वात कॉग्रेसमय असलेला पेठ तालुक्यावरील पकड ढिली झाल्याचे गत दोन तीन पंचवार्षिक पासून दिसून येत असून नव्या तरु ण कार्य कार्याची चणचण कॉँग्रेसला भासत असल्याचे सिध्द होते. युती व आघाडी फिस्कटल्यापासून आदिवासी तालुक्यात कॉँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांची फरपट झाल्याचे या निकालावरून दिसून आले.
पंचायत समितीवर निर्विवाद भगवा
चारही जागा जिंकून शिवसेनेने पेठ पंचायत समितीत निर्विवाद बहुमत सिद्ध केले. धोंडमाळ गणातून शिवसेनेचे तुळशीराम वाघमारे यांनी बाजी मारली. मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री वाघमारे या गणातून निवडून सभापती झाल्या. त्या माध्यमातून वाघमारे यांनी आपले राजकीय संबंध जोपासले. सुरगाणे गणातून शिवसेनेला पहिल्यांदाच सत्ता मिळविता आली. हा गण तसा कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असतांना कॉँग्रेसचे तालुक्यात कमी झालेले वर्चस्व माकपाच्या फायद्याचे पडले. माकपाने नामदेव मोहांडकर या जुन्या कायकर्त्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत रंग भरला. शिवसेनेनेही विलास अलबाड यांना समोर आणले. सेना - माकपाच्या या लढाईत अखेर सेनेने काठावर बाजी मारत विलास अलबाड यांनी गणावर ताबा मिळवला. करंजाळी गणामध्ये रणरागिणींचा तिरंगी सामना रंगला. शिवसेनेच्या पुष्पा गवळी व राष्ट्रवादीच्या अनिता गवळी या दोन्ही करंजाळी गावच्या रहिवासी तर मनसेच्या ललिता वाघमारे याही करंजाळी परिसरातल्याच यामुळे या गणाचे संपूर्ण राजकारण करंजाळी भोवती फिरल्याचे दिसून आले. करंजाळी गणातून निवडून आलेला उमेदवार सभापती पदाचा दावेदार ठरणार असल्याने ही लढत लक्षवेधी ठरली. यामध्ये शिवसेनेच्या पुष्पा नंदराम गवळी यांनी बाजी मारली. या गणात भाजपा, कॉँग्रेस, माकपा यांना हजारी गाठता आली नाही.