चणकापूर-तळवाडेपर्यंत जलवाहिनीचा प्रस्ताव रद्द
By Admin | Updated: November 11, 2015 22:40 IST2015-11-11T22:39:43+5:302015-11-11T22:40:21+5:30
गिरणा : खोऱ्यातील सर्वपक्षीयांचा विरोध

चणकापूर-तळवाडेपर्यंत जलवाहिनीचा प्रस्ताव रद्द
मालेगाव : गिरणा खोऱ्यातील सर्वपक्षीय विरोधामुळे मालेगाव महानगरपालिकेने चणकापूर ते तळवाडे पाइपलाइनचा प्रस्ताव रद्द केल्याचे लेखी पत्राद्वारे आयुक्तांनी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे यांना कळविले आहे.
चणकापूर धरणातून पाइपलाइनने पाणी आणावे यासाठी निर्मल योजनेंतर्गत १०० कोटी रुपये मालेगाव महापालिकेने मंजूर केले होते. या प्रस्तावाची माहिती गिरणा खोऱ्यातील मिळताच ब्राह्मणगाव येथे सर्वपक्षीय मेळावा घेऊन यास शेतकऱ्यांनी विरोध केला. तशी लेखी विचारणा संघर्ष समितीने सरपंच सुभाष अहिरे, शक्ती दळवी, संजय देवरे, अरुण अहिरे, संजय पवार, राजाराम शिरोळे आदिंंनी के. एन. अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटून सदर प्रस्तावास विरोध केला. याबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. यानुसार आयुक्तांनी लेखी पत्र देऊन हा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे कळविले आहे. पाइपलाइनचा विषय बंद झाला असला तरीही गिरणा खोऱ्यावर एक मोठे संकट येऊ घातलेले आहे. २००५ च्या समान पाणीवाटप कायद्याचा आधार घेऊन चणकापूर व पुनंदचे पाणी जळगाव जिल्ह्यासाठी गिरणा डॅममध्ये सोडावे असा कुटील डाव जळगावच्या नेत्यांनी टाकला आहे. धरणे कसमादेमध्ये आणि पाणी जळगाव जिल्हा वापरणार यास तीव्र विरोध आहे. आमदार, सहकार राज्यमंत्री यांना एका व्यासपीठावर आणून या प्रस्तावास विरोधासाठी रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय अहिरे यांनी जाहीर केला. (प्रतिनिधी)