नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल
By Admin | Updated: October 11, 2015 23:28 IST2015-10-11T23:23:22+5:302015-10-11T23:28:29+5:30
नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल

नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल
नाशिक : नाशिकचे ग्रामदैवत कालिकामाता आणि भगूर येथील रेणुकामाता यात्रोत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सकाळी पाच ते दहा आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे़
या अधिसूचनेनुसार कालिकादेवी नवरात्रोत्सव कालावधीत मोडक चौक सिग्नल ते संदीप हॉटेल कॉर्नर, मनपा आयुक्त निवासस्थान ते भूजल सर्वेक्षण कार्यालय, चांडक सर्कल ते संदीप हॉटेल, महामार्ग बसस्थानक ते संदीप हॉटेल या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १३ ते २२ आॅक्टोबर २०१५ या दरम्यान पहाटे पाच ते सकाळी दहा आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक बंद केली जाणार आहे़
या कालावधीत एस़टी़ बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने ही मोडक चौक सिग्नलहून खडकाळी सिग्नलमार्गे साठ फुटीरोड, द्वारका सर्कल या मार्गाने नाशिकरोड व सिडकोकडे जातील़ तसेच मुंबई नाक्यावरून शहरात येणारी हलकी वाहने ही महामार्ग बसस्थानक, टॅक्सी स्टॅण्ड, तुपसाखरे लॉन्स, हुंडाई शोरूमसमोरून चांडक सर्कल, भवानी सर्कल या मार्गाने त्र्यंबकरोडने शहरात येतील़ नाशिक शहरातून अंबड, सातपूर परिसरात जाणारी जड वाहने ही द्वारका सर्कलवरून गरवारे टी या मार्गाने, तर द्वारका सर्कलवरून पंचवटीत जाणारी जड वाहने ही कन्नमवार पूल, संतोष टी पॉइंट, रासबिहारी स्कूल यामार्गे पंचवटीत जातील़ सारडा सर्कलकडून गडकरी चौकाकडे येणारी वाहने ही एऩ डी़ पटेलरोड, किटकॅट चौफु ली या मार्गाने मोडक सिग्नलमार्गे जातील़ भगूर येथील रेणुकादेवी मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन रेस्ट कॅम्परोड हा केंद्रीय विद्यालय, जोजीला मार्ग, जोशी हॉस्पिटल हा मार्ग पहाटे पाच ते सकाळी अकरा आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे़
या कालावधीत भगूर गावाकडून देवळाली कॅम्पकडे जाणाऱ्या एस़टी़ बसेस, रिक्षा व इतर सर्व प्रकारची वाहने ही केंद्रीय विद्यालयासमोरून जोजीला मार्ग, जिजामाता चौक, पेरूमल रोड या मार्गाने जातील व देवळाली कॅम्पकडून भगूरकडे श्रीयश आर्केड (जोशी हॉस्पिटल), पेरूमल रोड, जिजामाता चौक, जोजीला मार्ग, केंद्रीय विद्यालय, भगूर या मार्गे जातील. यात्रोत्सव कालावधीत करण्यात आलेल्या बदलांची नागरिकांनी दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)