नाशिक-सिन्नर चौपदरीकरण कामात बदल
By Admin | Updated: August 19, 2016 00:16 IST2016-08-19T00:13:31+5:302016-08-19T00:16:05+5:30
हेमंत गोडसे : विविध कामांसाठी आणखी ३५ कोटींचा निधी मंजूर

नाशिक-सिन्नर चौपदरीकरण कामात बदल
सिन्नर : नाशिक- सिन्नर चौपदरीकरणाच्या कामात जनतेच्या सोयीसाठी बदल सुचविण्यात आले होते. यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने ३४ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून व्याप्तीत बदल झाल्याने या रस्त्याच्या बांधकामाची नवीन किंमत सुमारे ३५० कोटी रुपयांची झाली असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० चे चौपदरीकरणाचे काम नाशिक-सिन्नर टोलवेज लि. या उद्योजकाद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली सुरु आहे. सदर कामाच्या व्याप्तीत सिन्नर वळण रस्त्यावर व माळेगाव एमआयडीसी ते नाशिकरोड या रस्त्यावर मंजूर तरतुदींमध्ये जनतेने त्यांच्या सोयीसाठी काही बदल करण्याची मागणी खासदार गोडसे यांच्याकडे केली होती. बदलासाठी प्रस्ताव तयार करुन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविला होता.
चौपदरीकरणाच्या कामासाठी ३१२ कोटी ९६ लाख रुपयांची मंजूरी होती. जनतेने सुचविलेल्या कामाची किंमत ३४ कोटी ६२ लाख रुपये येत होती. त्यामुळे संबंधित खात्याने त्यास असमर्थता दर्शविली होती. सदर कामाच्या व्याप्तीत बदल करण्यात आले आहे़
करुन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने ३४ कोटी ६२ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्याची माहिती गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (वार्ताहर)