इगतपुरी तालुक्यात परिवर्तन
By Admin | Updated: February 24, 2017 23:56 IST2017-02-24T23:56:06+5:302017-02-24T23:56:26+5:30
शिवसेनेची ताकद वाढली : कॉँग्रेस-राष्ट्रवादीला दणका

इगतपुरी तालुक्यात परिवर्तन
सुनील शिंदे : घोटी
इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षितपणे निकाल लागले असून, या निकालात जिल्हा परिषदेच्या तीन गटात आणि पंचायत समितीच्या सात गणात शिवसेनेने बाजी मारल्याने तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद वाढल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकीच्या पूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होऊन इतर पक्षातील मातब्बर शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेला घवघवीत यश मिळाल्याचे बोलले जाते. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या एकही गटात शिवसेनेला यश आले नव्हते.तर पंचायत समितीच्या दहा गणांपैकी शिवसेनेला एकही जागा न मिळता, मित्रपक्षाच्या विजयावर समाधान मानावे लागले होते.मात्र या निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड मुसंडी मारीत तब्बल तीन गट ताब्यात घेतले आहेत तर गणातही सात जागा जिंकून पंचायत समतिी वर एकहाती सत्ता आणली आहे. घोटी गटातील पारंपरिक लढतीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.तर नांदगाव सदो गटातील काँग्रेसचे वर्चस्व शिवसेनेने मोडीत काढीत हा गट पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आहे.,तर वाडीव-हे गटात काँग्रेसने पुन्हा एकदा बाजी मारून हा एकमेव गट राखला आहे.तर शिरसाटे या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला शिवसेनेने सुरु ंग लावून या गटात विजय मिळविला आहे.या गटात माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांची प्रतिष्टा पणाला लागल्याने तालुक्याचे लक्ष या गटाकडे लागले होते.
पंचायत समितीवर एकहाती सत्ता
मागील निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी प्रत्येकी तीन, दोन मनसे एक आरपीआय आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल असलेल्या इगतपुरी पंचायत समितीत या निवडणुकीत परिवर्तन घडविले आहे. यात तब्बल सात जागा शिवसेनेने ताब्यात घेतल्या तर राष्ट्रवादी,काँग्रेस, भाजपला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. मनसेला मात्र खातेही उघडता आले नाही.
इगतपुरी तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या आमदार असल्याने या निवडणुकीत काँग्रेस पक्ष अपेक्षित यश मिळवेल अशी अपेक्षा असताना मात्र काँग्रेसला तालुक्यातील मतदारांनी सपशेलपणे नाकारले आहे.वाडीव-हे गटात आमदारकन्येला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने सर्व ताकद काँग्रेस पक्षाने या गटातच खर्ची केली.