जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण सुरू झाले मात्र चांदवड तालुक्यात अद्यापपर्यंत या लसीकरणाला प्रारंभ झाल्याचे दिसून येत नाही. सद्य:स्थितीत ४५ वयाेगटावर लसीकरण सुरू आहे. मात्र कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीकरण यांचा पुरवठा नसल्याने या लसीकरणातही अडचणी उत्पन्न होत आहे. चांदवड तालुक्यासाठी बुधवारी (दि.५) लसीकरणाचे १२०० डोस प्राप्त झाले. लसीच्या अनियमित पुरवठ्यामुळे फक्त ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे लसीकरण करण्यात येत आहे. चांदवडला अत्यल्प साठा शिल्लक असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे यांनी दिली. चांदवड तालुक्यासाठी आत्तापर्यंत एकूण १९ हजार १५० लसींचा डोस प्राप्त झाले असून, सर्व डोसचे तालुक्यातील नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून तालुक्यासाठी साडेतीन हजार डोसची मागणी करण्यात आली होती. परंतु फक्त १२०० डोस उपलब्ध झाले. त्यापैकी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय व चांदवड तालुक्यातील काजीसांगवी, तळेगावरोही, वडनेर, वडाळीभोई या पाच आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी २०० डोस वाटप करण्यात आले व संपूर्ण डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोट....
कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत
लसीचा पुरवठा झाला तरच लसीकरण मोहीम शनिवारपासून राबविता येईल, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, लसीकरणासाठी आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत असून, त्या त्या तालुक्यातील नागरिकांना त्याच तालुक्यात लसीकरण प्राधान्याने व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.