चांदवडला दारूचे दुकान पाडले बंद
By Admin | Updated: May 6, 2017 00:52 IST2017-05-06T00:52:43+5:302017-05-06T00:52:56+5:30
चांदवड : येथील गणूररोडवरील प्लॉट नंबर ३ मधील विनापरवाना देशी-विदेशी दारूचे दुकान सुरू असून, ते बंद करावे, अशी मागणी फुलेनगर व डावखरनगर येथील कॉलनीवासीयांनी निवेदनाद्वारे केली आहे.

चांदवडला दारूचे दुकान पाडले बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : येथील गणूररोडवरील गट नंबर ५७१ /१/१/ प्लॉट नंबर ३ मधील विनापरवाना देशी-विदेशी दारूचे दुकान सुरू असून, ते त्वरित बंद करावे, अशी मागणी फुलेनगर व डावखरनगर येथील कॉलनीवासीयांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्याकडे केली आहे.
याबाबत दि. २७ एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे येथील दारु विक्रीच्या दुकानाला परवाना देऊ नये, अशी मागणी रहिवासांनी निवेदनाद्वारे केली होती. मात्र सदर दुकान परवाना मिळण्याआधीच सुरु झाले आहे. तसा फलकही याठिकाणी लावण्यात आला आहे.
पसिरातील फुलेनगर व डावखरनगर भागातील रहिवाशांचा या दुकानास विरोध असून, सदर दुकान सुरू झाल्याने रहिवाशांनी गुरुवारी दुकानावर मोर्चा काढत दुकान बंद करण्यास भाग पाडले. पसिरात नागरी वस्ती आहे. या दुकानाचा वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दारूमुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
सदर विनापरवाना दारू विक्री दुकान त्वरित बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको, व शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती चांदवडचे मुख्याधिकारी, चांदवडचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता यांना देण्यात आल्या आहेत.