चांदवड तालुक्यात रॉकेल, स्वस्त धान्य मिळत नाही
By Admin | Updated: July 19, 2014 20:37 IST2014-07-18T23:12:26+5:302014-07-19T20:37:19+5:30
चांदवड तालुक्यात रॉकेल, स्वस्त धान्य मिळत नाही

चांदवड तालुक्यात रॉकेल, स्वस्त धान्य मिळत नाही
चांदवड : तालुक्यातील धान्यपुरवठा विभागातील गोंधळ त्वरित थांबवावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
चांदवड तालुक्यातील जनता धान्य व रॉकेलसाठी त्रस्त असून, वारंवार चकरा मारूनही धान्य व रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. शासनाने अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी फक्त कागदावरच केली काय ? असा सवाल विचारला जात असून, या प्रश्नासंबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रार करूनही त्यांच्याकडून योग्य उत्तरे मिळत नाही.
आता लवकरच मुस्लीम समाजाचा रमजान सण येत असून, नागरिकांना व गोरगरीब जनतेला धान्य मिळणार की नाही याबाबत पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात, तर धान्य दुकानदारांकडे चौकशी केली असता गेल्या सहा महिन्यांपासून धान्य आलेच नाही असे सांगत असल्याने गोरगरिबांना येत्या आठ दिवसांत धान्य व रॉकेलपुरवठा करावा अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष परवेज पठाण यांनी यासंबंधी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. (वार्ताहर)
इगतपुरी महाविद्यालयात भवरे यांचे व्याख्यान
इगतपुरी : येथील मविप्र महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांचे व्याख्यान झाले. यावेळी भवरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी गुरुचा आदर करावा. याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य वाय. सी. महाजन, प्रा. एस. व्ही. महाजन, प्रा. दिवटे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवीदास गिरी यांनी केले. उपप्राचार्य महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)