रेशनच्या डाळीला उठावाची शक्यता
By Admin | Updated: September 11, 2016 02:03 IST2016-09-11T02:03:32+5:302016-09-11T02:03:43+5:30
दर्जा बदलला : खुल्या बाजाराच्या भाववाढीचा परिणाम

रेशनच्या डाळीला उठावाची शक्यता
नाशिक : दुय्यम दर्जा व खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव असल्यामुळे रेशनच्या तूरडाळीकडे पाठ फिरविलेले दुकानदार रेशनसाठी तूरडाळ उचलण्याची शक्यता पुरवठा खाते व्यक्त करीत असून, नाशिक शहराला पुरविण्यात आलेली निकृष्ट डाळ पुरवठादाराने बदलून दिल्यामुळे व खुल्या बाजारात दर वाढल्यामुळे येत्या आठवड्यात शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून डाळ उपलब्ध होणार आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी पावणे पाच हजार क्विंटल तूरडाळ शासनाने मंजूर करीत, पुरवठादारामार्फत ती उपलब्धही करून दिली. परंतु या डाळीचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने नांदगाव, नाशिक धान्य वितरण अधिकाऱ्यांनी शासकीय गुदामात डाळ उतरवून घेण्यास नकार देत, परत पाठविली होती. मुळात तूरडाळ दर्जाहीन व त्यातच तिचा दरही १०३ रुपये किलो असल्याने शिधापत्रिकाधारक घेणार नाहीत यावर ठाम असलेल्या रेशन दुकानदारांनी तूरडाळ घेण्यास नकार दिला. रेशनमधून तूरडाळ उपलब्ध झाल्याचे पाहून खुल्या बाजारात दीडशे ते १८० रुपयांपर्यंत पोहोचलेली डाळ अगदीच ९० ते शंभर रुपयांपर्यंत आल्यामुळे रेशनची दर्जाहीन तूरडाळ कोण घेईल, असा प्रश्न निर्माण झाला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर पुरवठा खात्याने जिल्ह्यातील प्रत्येक तूरडाळीच्या दर्जाची तपासणी करून घेतली. त्यातून वाहतुकदाराने खराब डाळ परत नेली व ती बदलून दिली आहे. नवीन आलेल्या तूरडाळीचे नमुने तपासण्यात आले असून, ती उत्कृष्ट दर्जाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सणासुदीचे दिवस पाहता खुल्या बाजारात तूरडाळीचे दर पुन्हा दीडशे रुपयांच्या पुढे सरकले असून, सामान्यांना ती परवडणारी नसल्याने रेशनमधून १०३ रुपयांच्या डाळीला शिधापत्रिकाधारक पसंती देतील, अशी अपेक्षा पुरवठा खाते व रेशन दुकानदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात दुकानदारांकडून रेशनच्या तूरडाळीची मागणी वाढेल, असे पुरवठा खात्याला वाटू लागले आहे. दरम्यान, खासगी केंद्रांवर स्वस्त दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा पुरवठा खात्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला असला तरी, त्यासाठी डाळ उपलब्ध करून देण्यास हात आखडता घेतल्याने हा प्रस्ताव गुंडाळला गेला आहे. (प्रतिनिधी)