नियुक्त संचालक मंडळाची शक्यता धूसर
By Admin | Updated: November 23, 2015 23:32 IST2015-11-23T23:31:51+5:302015-11-23T23:32:35+5:30
दादा भुसे : सटाणा, नामपूर बाजार समित्या

नियुक्त संचालक मंडळाची शक्यता धूसर
सटाणा : बहुचर्चित सटाणा बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूर स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात येऊन सात महिने उलटले; मात्र अजूनही इच्छुकांना प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीची प्रतीक्षा आहे. याबाबत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी अखेर प्रशासकीय संचालकांची दिवसेंदिवस यादीच लांबलचक होत असल्याचे सांगून पेचप्रसंग निर्माण झाल्याची कबुली देत एकप्रकारे संचालक मंडळ नियुक्तीची शक्यता फेटाळून लावली आहे.
बागलाण तालुक्यातील सोमपूर येथील एका कार्यक्रमात सहकार राज्य मंत्री दादा भुसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमातच टेंभे (खालचे) येथील सरपंच भाऊसाहेब अहिरे उपस्थित होते. त्यांनी कार्यक्र म सोडून थेट मंत्रिमहोदयांना टार्गेट करत बाजार समित्यांचे विभाजन
झाले.
प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीचे काय, असा सवाल उपस्थित केला. यावेळी भुसे यांची चांगलीच अडचण झाली आणि नियुक्त संचालक मंडळासंदर्भात प्रथमच जाहीर वक्तव्य करण्याची त्यांच्यावर वेळ आली. भुसे म्हणाले की, सटाणा आणि नामपूर या स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्यानंतर प्रशासक कामकाज पाहत आहेत.
नियुक्त संचालक मंडळासाठी शासनस्तरावर हालचालीही सुरू झाल्या मात्र संचालकांची रोज यादी वाढतच चालली आहे. आता यादी एवढी मोठी झाली की निवड कोणाची करावी, असा प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट करत भुसे यांनी नाराजांना सांभाळताना पेचप्रसंगाला कोण सामोरे जाईल, असा प्रतिसवाल करत एकप्रकारे प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीची शक्यता त्यांनी सपशेल फेटाळून लावली.
खासदार सुभाष भामरे, रामचंद्रबापू पाटील, राघो अहिरे, संजय चव्हाण यांनी बाजार समितीच्या विभाजनासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यात सटाणा आणि नामपूर या दोन्ही स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्या. त्यानंतर अनेक इच्छुकांनी संचालक मंडळावर वर्णी लावण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले.
त्यामुळे अनेकांना सभापती, उपसभापती आणि संचालक पदाचे डोहाळे लागले मात्र सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी नियुक्त संचालक मंडळाची शक्यता फेटाळल्याने इच्छुकांचे एकप्रकारे स्वप्नच भंगले आहे. (वार्ताहर)