कांदा लिलाव प्रश्नी तोडग्याची शक्यता

By Admin | Updated: July 28, 2016 01:52 IST2016-07-28T01:51:15+5:302016-07-28T01:52:34+5:30

आज निर्णय : पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे वेगवेगळ्या बैठका

Chance of settlement of onion auction question | कांदा लिलाव प्रश्नी तोडग्याची शक्यता

कांदा लिलाव प्रश्नी तोडग्याची शक्यता

 नाशिक : कांदा गोणीत भरून आणण्याला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध होऊ लागला असून, बुधवारी (दि.२७) जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचा लिलाव त्यामुळे बंद होता. कांदाप्रश्नी तोडगा काढण्यासाठी उद्या गुरुवारी (दि.२८) पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे दोन वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बाजार समिती नियमनमुक्त करण्याच्या अध्यादेशात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने २० जणांची समिती नियुक्त केली असून, त्यात राष्ट्रवादीचे माजी खासदार व नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांची नियुक्ती केली आहे. पिंगळे यांच्यासह बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र राऊत यांचाही (पान ५ वर)

बाजार समिती प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या २० जणांच्या समितीत माथाडी प्रतिनिधी म्हणून नरेंद्र पाटील, अडते प्रतिनिधी म्हणून सोहनलाल भंडारी व अशोक हांडे, आमदार शरद सोनवणे, व्यापारी प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब बेंडे, शंकर पिंगळे यांचा समावेश आहे. तर शेतकरी म्हणून भाजपा नेते पाशा पटेल यांचा या २० जणांच्या समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीची बैठक गुरुवारी दुपारी चार वाजता पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. या समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार बाजार समिती नियमनमुक्त अध्यादेशात सुधारणा करण्यात येणार आहे.
कांदा गोणीत आणला तरच लिलाव पुकारण्याची घेतलेली व्यापाऱ्यांची भूमिका आडमुठी व शेतकरी विरोधी असल्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. बुधवारी कळवणला या गोणी मार्केटला विरोध करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. तर बागलाणला तहसीलदारांना कांद्या गोणीची भेट देण्यात आली. येवला तसेच मुंगसे उपबाजारही बंदच होता. पणनमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता होणारी व्यापारी प्रतिनिधींची बैठक व चार वाजता २० सदस्यांच्या समितीच्या बैठकीतूनच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chance of settlement of onion auction question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.