नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ साकारणे आव्हानात्मक
By Admin | Updated: September 22, 2016 01:32 IST2016-09-22T01:31:56+5:302016-09-22T01:32:14+5:30
सीताराम कुंटे : आराखड्यातील त्रुटी दूर करणार

नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ साकारणे आव्हानात्मक
नाशिक : शहरी व्यवस्थापनात नवनवीन संकल्पना आणण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना आहे. नाशिकला स्मार्ट सिटी साकारण्याचे काम आव्हानात्मक असून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत नाशिक शहराचा समावेश झाल्यानंतर त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) अर्थात कंपनीची पहिली बैठक सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना कुंटे यांनी सांगितले, नाशिक महापालिकेने सादर केलेल्या आराखड्यानुसार रेट्रोफिटिंग (गावठाण पुनर्विकास) अंतर्गत जुन्या नाशिक परिसराचा पुनर्विकास हाती घेणे आव्हानात्मक आहे, परंतु त्यातून मार्ग काढला जाईल. मुंबईत दाट वस्तीच्या भागात पुनर्विकासाचे काही प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही पुनर्विकासाची योजना राबविण्याचा विचार राहील. नवीन विचार व्यवस्थापनात आणण्यासाठी स्मार्ट सिटीचा आराखडा आहे. सदर आराखड्यातील असणाऱ्या त्रुटी दूर केल्या जातील. त्यातील आणखी बारकावे शोधून त्यात सुसूत्रता आणली जाईल.