लूटमार रोखण्याचे आव्हान
By Admin | Updated: April 25, 2015 01:42 IST2015-04-25T01:42:36+5:302015-04-25T01:42:56+5:30
लूटमार रोखण्याचे आव्हान

लूटमार रोखण्याचे आव्हान
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना दळणवळणाची तथा उपाहाराची सुविधा पुरवणाऱ्या व्यावसायिकांवर निर्बंध ठेवून त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य लूटमारीला आळा घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. या व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्याबाबत कोणत्याही शासकीय यंत्रणेने नियोजन केलेले नाही. कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये देश-विदेशातून भाविक दाखल होणार आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानक, द्वारका, आडगाव नाका, मुंबई नाका या परिसरात उतरणाऱ्या भाविकांना शहरात घेऊन जाण्यासाठी शहर बसेस अपुऱ्या पडतात. परिणामी, त्यांना रिक्षांची मदत घ्यावी लागते. याशिवाय भाविकांची शहरातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी रिक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘नाशिक दर्शन’साठीही भाविक रिक्षाचा पर्याय आजमावतात; मात्र अनेकदा बाहेरगावच्या भाविकांकडून वाजवीपेक्षा अधिक पैसे घेतले जातात. भाविक मोठ्या उत्सुकतेने साधुग्रामसह शहरातील मंदिरांची सैर करतात; मात्र जादा भाडे घेऊन त्यांची लूट होत असल्याचे अनुभव येतात. सिंहस्थकाळात खाद्यपदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होते; मात्र हॉटेल व्यावसायिक व रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून गर्दीच्या काळात जादा पैसे घेतले जातात. गरजू भाविकांसमोर कोणताही पर्याय नसल्याने त्यांना हे पदार्थ घ्यावे लागतात. भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या या दोन्ही खासगी सेवांवर शासनाच्या वतीने कोणतेही निर्बंध नसून, तशी सक्षम यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची लूटमार कशी रोखावी, असे आव्हान उभे ठाकले आहे.