घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचे आव्हान
By Admin | Updated: March 3, 2015 00:34 IST2015-03-03T00:33:57+5:302015-03-03T00:34:13+5:30
उद्दिष्टपूर्तीसाठी धावपळ : फेब्रुवारीअखेर ९६ कोटींची वसुली, थकबाकीदारांना वॉरंट

घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचे आव्हान
नाशिक : मार्चअखेरपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या करविभागाची आता धावपळ सुरू झाली असून, ७३ हजार मिळकतधारकांना सूचनापत्र पाठविण्यात आले आहे. फेब्रुवारीअखेर ६३ कोटी रुपये घरपट्टी, तर ३३ कोटी रुपये पाणीपट्टीची वसुली झाली आहे. चालू आर्थिक वर्ष संपायला आता अवघे २८ दिवस उरले असताना पालिकेला घरपट्टी-पाणीपट्टीचे निम्मेच उद्दिष्ट गाठता आले आहे. दरम्यान, थकबाकीदार १७९६ मिळकतधारकांना जप्तीचे वॉरंट बजावण्यात आल्याचे करविभागाकडून सांगण्यात आले.
महापालिकेने आर्थिक परिस्थितीत सुधारणेकरिता घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून, २८ फेब्रुवारीअखेर ६३ कोटी ३० लाख रुपये घरपट्टीची वसुली झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत त्यात तीन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्व व पंचवटी विभागात मात्र वसुली समाधानकारक झालेली नाही. महापालिकेने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी ११५ कोटींचे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू मागणीच्या तुलनेत ६४ टक्के वसुली झालेली आहे. सर्वसाधारणपणे मार्चअखेरपर्यंत ८० कोटी रुपयांपर्यंत घरपट्टीची वसुली होण्याची शक्यता करविभागाकडून व्यक्त केली जात आहे. मागील आर्थिक वर्षात ७० टक्के घरपट्टीची वसुली झाली होती, तर करविभागाने १०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. आता मार्चअखेरपर्यंत उद्दिष्टानुसार सुमारे ५२ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे आव्हान करविभागापुढे असून, त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुदतीत घरपट्टी न भरणाऱ्या ७३ हजार ४३० मिळकतधारकांना सूचनापत्र पाठविण्यात आले आहे. त्यातील १७ हजार १४३ मिळकतधारकांनी सूचनापत्र मिळाल्यानंतर करभरणा केलेला आहे. याशिवाय थकबाकीदार १७९६ मिळकतधारकांना वॉरंट बजावण्यात आले असून, त्यातील ६५० मिळकतधारकांनी १ कोटी ३ लाख रुपयांचा करभरणा केला आहे. थकबाकीदारांकडून पालिकेला ५ कोटी ६४ लाख रुपयांची वसुली अपेक्षित आहे.
घरपट्टीबरोबरच पालिकेने पाणीपट्टी वसुलीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. फेब्रुवारीअखेर ३३ कोटी १७ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली असून, पालिकेने यावर्षी ७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी फेब्रुवारीअखेर २४ कोटी २९ लाख रुपयांची वसुली झाली होती. यंदा त्यात ९ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी दोन्ही मिळून सुमारे ९६ कोटी रुपयांची वसुली केली असून, उद्दिष्टानुसार आणखी ९० कोटी रुपयांची वसुली मार्चअखेरपर्यंत करण्याचे आव्हान आहे. (प्रतिनिधी)