पोलीस निरीक्षकांसमोर गुन्हेगारीचे आव्हान
By Admin | Updated: March 25, 2015 23:57 IST2015-03-25T23:57:16+5:302015-03-25T23:57:44+5:30
अधिकारी बदलले, प्रश्न ‘जैसे थे’

पोलीस निरीक्षकांसमोर गुन्हेगारीचे आव्हान
इंदिरानगर : उपनगरबरोबरच इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे येथील प्रमुखांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नवे प्रमुख नेमले आहेत़ उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत या दोघांपुढेही परिसरातील वाढत्या घरफोड्या, चेनस्नॅचिंग यांसह परिसरात फोफावलेल्या गुन्हेगारीचे आव्हान असणार आहे़
इंदिरानगर पोलीस ठाण्यातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात अपयश येत असल्याने पोलीस आयुक्तांना दहा महिन्यांत चौथ्यांदा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलण्याचा प्रयोग करावा लागला़ विशेष म्हणजे, यापूर्वीच्या तिघांनाही वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश मिळविता आला नसल्याने नागरिकांनी बदलीची मागणीही केली होती़ इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत नासर्डी ते विल्होळी जकात नाक्यापर्यंतचा परिसर येतो़
पोलीस ठाणे हद्दीतील झोपडपट्ट्यांमधील काही सराईत गुन्हेगार तसेच अवैध धंद्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ या परिसरात लुटमारी, चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या घटनांचा आलेख चढता आहे़
यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांना निवेदन दिले़ यावेळी युनिक ग्रुप राजीवनगर, शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघ, शिव मल्हार सेवा संस्था, विठ्ठल रुक्मिणी हास्य क्लबच्या सदस्यांसह यशवंत वाजे, स्वाती बेलदार, सविता एरंडे, माणिक मेमाणे, सुधीर बिडवई आदि उपस्थित होते़ (वार्ताहर)