काँग्रेसपुढे सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:20+5:302021-09-21T04:16:20+5:30

अतुल शेवाळे, मालेगाव : महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे कायमच वर्चस्व दिसून आले आहे. महापालिका स्थापनेला २० वर्षे उलटली आहेत. या ...

The challenge for the Congress is to retain power | काँग्रेसपुढे सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान

काँग्रेसपुढे सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान

अतुल शेवाळे, मालेगाव : महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे कायमच वर्चस्व दिसून आले आहे. महापालिका स्थापनेला २० वर्षे उलटली आहेत. या दोन दशकांच्या कार्यकाळात कॉंग्रेसने तीन वेळा महापाैरपद पटकावत महापालिकेची सत्ता हस्तगत केली आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जनता दल, महागठबंधन आघाडी, एमआयएम आदी पक्षांनी काँग्रेसचा वारू रोखण्यासाठी व्यूहरचना सुरू केल्या आहेत.

महापालिकेची स्थापना १७ डिसेंबर २००१ रोजी झाली. पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत जनता दलाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत माजी मंत्री, दिवंगत नेते निहाल अहमद यांची मालेगावच्या पहिल्या महापौरपदी वर्णी लागली. कॉंग्रेस व जनता दलामध्ये विधानसभेच्या निवडणुकीपासूनच चुरस दिसून आली. महापालिकेची सत्ताही जनता दलाकडे गेल्यामुळे कॉंग्रेसचा झालेला पराभव जिव्हारी लागला. यानंतरच्या महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने करिष्मा दाखवत जनता दलाकडून महापालिकेची सत्ता हिसकावून घेतली. महापालिकेच्या महापौरपदी माजी आमदार आसीफ शेख यांची वर्णी लागली. त्यानंतर धर्मगुरू तथा विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा करिष्मा चालला. तिसरा महाजचे नजमुद्दीन शेख गुलशेर यांची महापौरपदी वर्णी लागली. दरम्यानच्या काळात मालेगाव शहर बॉम्बस्फोटाने हादरले. या बॉम्बस्फोटानंतर शहरात जखमींवर उपचार करण्यासाठी सुसज्ज रुग्णालय नसल्याची बाब समोर आली. शासन अनुदानातून तत्कालीन कॉंग्रेस शासनाने मालेगावी जिल्हा दर्जाचे सामान्य रुग्णालय उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच महापालिकेनेही कालीकुट्टी भागात जमीन उपलब्ध करून दिली. येथूनच कॉंग्रेसच्या राजकारणाला बळ मिळाले. जनतेनेही कॉंग्रेसला खंबीरपणे साथ दिली. महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या व पहिल्या महिला महापौर म्हणून श्रीमती ताहेरा शेख यांची वर्णी लागली. या घडामोडीनंतर कॉंग्रेसचा वारू चौफेर उधळला. महापालिकेची नवीन इमारत व महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेसने शासनस्तरावरून प्रयत्न करून विकासकामे मार्गी लावली. परिणामी, महापालिकेच्या सत्तास्थानी कॉंग्रेसचे वर्चस्व कायम दिसून आले.

इन्फो

आरोप-प्रत्यारोप सुरू

२०१७ च्या निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसचे तब्बल २७ नगरसेवक निवडून दिले, तर विरोधी पक्षाच्या महागठबंधनचे २६ नगरसेवक निवडून दिले. महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे २७, शिवसेनेचे १२ व छुपा पाठिंबा दिलेल्या भाजप ९, एमआयएम ७ अशा ५५ नगरसेवकांच्या संख्याबळावर कॉंग्रेसचे रशीद शेख व सेनेचे सखाराम घोडके पहिल्या टर्ममध्ये महापौर व उपमहापौरपदी विराजमान झाले. तर, शेवटच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कॉंग्रेसच्याच ताहेरा शेख व सेनेचे निलेश आहेर यांनी महापौर व उपमहापौरपद भूषविले. महापालिकेच्या राजकारणात कॉंग्रेसचा कायम दबदबा राहिला आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जनता दल, महागठबंधन आघाडी, एमआयएम आदी पक्षांनी कॉंग्रेसचा वारू रोखण्यासाठी व्यूहरचना सुरू केल्या आहेत. तर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पूर्व भागात सभा, जलसांमधून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Web Title: The challenge for the Congress is to retain power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.