विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचे आव्हान

By Admin | Updated: September 30, 2014 23:41 IST2014-09-30T23:39:48+5:302014-09-30T23:41:02+5:30

दक्षता : निवडणूक आयोगाची गस्ती पथके सज्ज

Challenge of black money in assembly elections | विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचे आव्हान

विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचे आव्हान

नाशिक : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे़ सर्व पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, प्रत्येकाची जोरदार तयारी सुरू आहे़ उमेदवारांची संख्या मोठी असल्याने ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे़ यामध्ये पैशाचा मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे़ यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या काळ्या पैशाचे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान असणार आहे़ यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे़ जिल्ह्यात ४५ भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, आचारसंहिता सुरू झाल्यापासून पथके कार्यरत झाली आहेत़
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पैशाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शहरातील पाच तसेच ग्रामीण भागातील दहा अशा १५ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी तीन याप्रमाणे ४५ भरारी पथके कार्यरत करण्यात आली आहेत़ शहरासह ग्रामीण भागात संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांच्या कसून तपासण्या या पथकाने सुरू केल्या आहेत़ लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर झाल्याचे तक्रारींद्वारे आयोगाच्या निदर्शनास आले होते. हा काळा पैसा ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर करण्यात आला होता़ त्यातही तपासणी होत असल्याने रुग्णवाहिका, शववाहिका, रक्त संकलन व्हॅन अशा वाहनांतूनही पैशाची वाहतूक व वाटप झाल्याचे किस्से सांगितले जात आहेत़ या निवडणुकीत असा गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने निवडणूक आयोगाच्या पथकांच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे़ जिल्ह्यातील सर्वच नाक्यांवर तसेच रस्त्यांवरही वाहने अडवून पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Challenge of black money in assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.