चैतन्याचे गाव झाले ‘रिते’!

By Admin | Updated: August 14, 2016 02:32 IST2016-08-14T02:31:00+5:302016-08-14T02:32:22+5:30

चैतन्याचे गाव झाले ‘रिते’!

Chaitanya's village became 'Rite'! | चैतन्याचे गाव झाले ‘रिते’!

चैतन्याचे गाव झाले ‘रिते’!

 किरण अग्रवाल

 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सामान्यजनांतील वा भाविकांच्या मनातील श्रद्धा जागवल्या जाऊन धार्मिक-आध्यात्मिक मंथन तर घडून आलेच, शिवाय शहरातील विविध विकासकामेही मोठ्या प्रमाणात घडून आली. त्यामुळे गेले वर्षभर जणू गोदेच्या प्रवाहाबरोबरच चैतन्याचा झराही नाशिक-त्र्यंबकेश्वरी खळाळत होता. आता ध्वजावतरणाने या पर्वाची अधिकृत सांगता झाल्याने जणू चैतन्याचे गाव रिकामे झाले आहे.आस्तिकाची श्रद्धा वेळोवेळी ठेचकाळत असली तरी ती तसूभरही कमी होत नाही, कारण ऐहिक व पारमार्थिक कल्याणाची आशा त्यामागे असते. त्याच दृष्टीने विचार करता, सिंहस्थ ध्वजावतरणाने या पर्वाची सांगता घडून येण्यापूर्वीच त्यानिमित्ताने केल्या गेलेल्या कामातील ‘पितळ’ उघडे पडून गेले असताना व त्याहीपूर्वी ज्यांच्या दर्शनाने किंवा सत्संगाने पुण्य पदरी पडते असा भाव बाळगला जातो त्या साधू-महंतांमधीलच षडरिपूंचा पदोपदी प्रत्यय येऊन गेला असला तरी, हे पर्व संपल्याचे ‘रिते’पण मात्र नाशिक व त्र्यंबकवासीयांना येते काही दिवस का असेना, नक्कीच खलणार आहे.
बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा अनेकार्थाने चैतन्याची अनुभूती देणाराच असतो. साधूंच्या दृष्टीने तो धार्मिक-आध्यात्मिक जागराला संधी देणारा असतो, तर संधिसाधूंना विकासाच्या नावाखाली हात ओले करायची पर्वणी मिळवून देणारा असतो. यातील दुसरा भाग काहीसा नजरेआड केला, तर सिंहस्थ पर्व हा खरेच मानवी स्वारस्य जागवणारा ‘इव्हेंट’च ठरावा. यानिमित्त उभे राहणारे साधुग्राम म्हणजे जणू चैतन्याचेच गाव असते, जे यंदाही मोठ्या कौतुकाचे केंद्र ठरले होते. विशेषत: विविध आखाडे व खालशांचे राजेशाही मंडप, त्यातील साधू-महंतांची ‘उंची’ राहणी, त्यांचे असणे-दिसणे, प्रगत तंत्राशी म्हणजे बदलत्या काळाशी सांधा जुळवत या संन्यस्तांच्या हाती आलेली अद्ययावत भ्रमण संपर्क साधने, त्यांचा आहार-विहार तसेच माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काही काहींनी चालविलेल्या खटपटी आदि बाबी सामान्यजनांच्या वा अस्तिकांच्याच नव्हे तर नास्तिकांसाठीही औत्सुक्याच्या ठरल्या होत्या. त्यामुळे साधुग्रामात दर्शन वा सत्संगासाठी येणाऱ्यांपेक्षाही पर्यटनास येणाऱ्यांची मोठी गर्दी होत होती. शाहीस्नानाच्या तीनही पर्वण्या महिनाभरात आटोपल्यानंतर हे साधुग्राम रिकामे झाले असले तरी वर्षभराचा पर्वकाल सुरूच होता, ज्याची सांगता सिंह राशीतून गुरुने कन्या राशीत प्रवेश केल्यावर घडून आली. औपचारिकतेचा भाग म्हणून या सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ होताना नाशिकच्या रामकुंडावर व त्र्यंबकच्या कुशावर्तावर उभारल्या गेलेल्या ध्वजा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत उतरवून घेतल्याने चैतन्याचा कुंभ जणू रिता झाला आहे. या पर्वानिमित्त शासन-प्रशासनाच्या पातळीवर आणि भाविक-भक्तांच्या तसेच शहरवासीयांच्या पातळीवर एक अनामिक का होईना, वर्षभर सळसळ दिसून येत होती. यंत्रणा त्यानिमित्तच्या विकासकामांत गुंतलेल्या दिसायच्या तसे नागरिक घराघरांत येणाऱ्या पाहुण्या भाविकांच्या सेवेत रमलेले दिसायचे. हा सारा पसारा आता सिंहस्थ संपल्याने आवरला गेला आहे. ‘रिकाम’पण आले आहे त्या अर्थाने.
महत्त्वाचे म्हणजे, श्रद्धा ही किती भाबडी व भोंगळ असते बघा, ज्यांच्या दर्शनासाठी भाविक इतके उतावीळ असतात ते साधू-महंत इतरांना राग, लोभ, काम, क्रोध, मोह-मत्सरापासून दूर राहण्याचा उपदेश करीत असले तरी, तेच यापासून स्वत:ला कसे दूर ठेवू शकलेले नाहीत, हे या सिंहस्थातही प्रकर्षाने पुढे येऊन गेले. परंतु तसे असताना सामान्यांच्या श्रद्धेत काडीचाही फरक पडला नाही. अगदी सिंहस्थ पर्वाच्या प्रारंभी महंत ग्यानदास यांनी नाशकात येऊन साधू संप्रदायाचे नेतृत्त्व आपल्याकडेच असल्याचे दर्शवत जे पुढारपण केले त्याला त्र्यंबकच्या महंत नरेंद्रगिरींनी आक्षेप घेतला होता. या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला की नरेंद्रगिरींनी ग्यानदासांना ‘पागल’ संबोधले, तर महंत राजेंद्रदास यांनी पलटवार करीत त्यांना ‘भूमाफीया’ म्हटले. पर्वण्यांच्या अखेरपर्यंत ही धुम्मस सुरू होती. अर्थात हे झाले शैव-वैष्णवांमधले द्वंद, त्याखेरीज वैष्णवातील आखाड्यांमध्येही एकवाक्यता नव्हती. महंताईवरून तसेच जागावाटपावरून त्यांच्यात परस्पराचा ‘यथेच्छ’ उद्धार होत होता. बहिष्कार घालण्यापर्यंत व पुढील म्हणजे उज्जैनच्या कुंभमेळ्यात ‘देख लेंगे’ म्हणेपर्यंत ही पातळी गेली होती. हद्द म्हणजे, सहनशीलता व क्षमाशीलतेचा पाठ भक्तांना पढविणाऱ्या या साधूंच्या सेवेकरी-अनुयायांनी जंगलीदास महाराजांची मिरवणूक शाहीमार्गावरून काढली गेली म्हणून लाठ्या-काठ्या व तलवारी उगारून आपल्यातील ‘तमो’गुणांचा लोप झाला नसल्याचे दर्शवून दिले होते. त्र्यंबकेश्वरात तर ज्यांनी आखाडा व्यवस्थेची रचना केली व ज्यांच्या ठायी ‘तीर्थ’ अनुभवले जाते त्या आद्य शंकराचार्यांचे गादीधारक स्वामी स्वरूपानंदांना आखाड्यांच्या स्नानापूर्वी कुशावर्तात स्नानास मनाई करण्याचा प्रयत्न झाला. अशी एक ना अनेक उदाहरणांची अगर घटनांची उजळणी येथे करता येईल, की ज्यातून सश्रद्धांच्या मनाला धक्केच बसत गेलेत. उपदेशाच्या असो की प्रसादाच्या, ‘दाना’चा दागिना मिरवणारा सर्वसंग परित्यागी साधू समाज काही तरी मागण्यासाठी शासनाच्या दारात याचकाच्या भूमिकेत उभा राहिलेला पाहूनही अनेकांची मने हळहळली. अर्थात, आम्ही आमच्या स्वत:साठी नाही तर भक्तांसाठीच मागितले अशी त्यातील मखलाशी असला तरी, कशासाठी तसे, या प्रश्नाचे उत्तर अखेरपर्यंत सापडले नाहीच. पण अशाही स्थितीत श्रद्धांचे बंध घट्ट व रंग गहिरेच राहिले व हीच आपल्या संस्कृतीची खासीयत असल्याने, या श्रद्धांचा मेळा ठरणारा कुंभमेळा सरला म्हटल्यावर त्याबद्दलची चुटपूट जाणवणे साहजिकही आहे.
दुसरे म्हणजे, सिंहस्थानिमित्त शहराच्या विकासाची कवाडे उघडतात हा गेल्या दोन-तीन सिंहस्थापासूनचा अनुभव यंदाही कायम राहिला. एरव्ही शहरातील विकासकामे करण्यास निधीच्या वा अन्य मंजुरी वगैरेच्या स्२ातराशेसाठ मर्यादा आड येतात. त्यातही यंदा जकातबंदी, त्यानंतरचा एलबीटीचा फटका यामुळे नाशिक महापालिकेच्या तिजोरीत तसाही खडखडाट होता. त्यामुळे कामे होत नसल्याने सत्ताधारीच अडचणीत आल्यासारखी स्थिती होती. सत्ता असल्याने काही तरी करून दाखवायलाच हवे म्हणून मोठ्या उद्योगसमूहांना सोबत घेऊन खासगी पातळीवर काही प्रकल्प साकारण्याची वेळ त्यांच्यावर आली असताना सिंहस्थाने महापालिकेला चांगला हात दिला. महापालिकेच्या स्वत:च्या निधीखेरीज शासनाचा कोट्यवधीचा निधी लाभल्याने त्याद्वारे शहराचे रूप पालटण्याचा प्रयत्न करणे शक्य झाले. नाही म्हटले तरी, विविध २७ यंत्रणांच्या माध्यमातून सुमारे २३७८ कोटींची कामे साकारली गेलीत. त्यात प्रामुख्याने रस्ते, बाह्य वळण मार्ग, पूल, नदीकाठांवरील घाटांचे विस्तारीकरण आदि कामे घडून आलीत. त्र्यंबकमध्येही अशी कामे केली गेली व अगदी पर्वण्या तोंडावर येईपर्यंत ती केली गेल्याने म्हणजे उरकल्याने त्यांच्या गुणवत्तेचे प्रश्न उपस्थित झाले. परिणामी सिंहस्थाचे ध्वजावतरण होऊन या पर्वाची सांगता होण्या आधीच, म्हणजे अवघ्या वर्षभराच्या आतच यातील काही कामे गेल्या पावसात व त्यामुळे आलेल्या पुरात वाहून गेल्याचे दिसून आले. परंतु तसे असले तरी नैसर्गिक आपत्तीने ओढवलेल्या या परिस्थितीच्या पलीकडे जाऊन व सदरची कामे करताना काही संधिसाधूंनी आपली ‘करामात’ केल्याचे नेहमीप्रमाणे मान्य करूनही बोलायचे तर सिंहस्थानिमित्त झालेला विकास हा नजरेत भरणाराच ठरला आहे. सिंहस्थाबद्दल आस्था असो अगर नसो, तो काहींना का हवा असतो याचे कारण या ‘संधी’मागे
दडले आहे. तेव्हा तसेही गृहीत धरता त्यानिमित्ताने जे काही आकारास आले ‘तेही नसे थोडके’ असेच म्हणायला हवे. आता ही संधी पुन्हा बारा
वर्षांनीच येणार आहे. तोपर्यंत आपापल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अर्थसंकल्पांच्या मर्यादांमध्येच विकासाचे चक्र फिरवावे लागणार आहे. सिंहस्थ संपल्यामुळे यंत्रणांमध्ये येणाऱ्या ‘रिते’पणाकडे त्यादृष्टीनेच पाहता यावे. शेवटी कुणाचेही, कोणतेही काम थांबणार नसले तरी सिंहस्थाच्या निमित्ताने आलेले त्यातील भारलेपण नक्कीच कमी होणार आहे. ‘रिते’पण त्यालाच तर म्हणता यावे.

Web Title: Chaitanya's village became 'Rite'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.