सभापतिपदासाठी सेनेतील इच्छुकांत चुरस
By Admin | Updated: September 3, 2014 00:38 IST2014-09-03T00:38:32+5:302014-09-03T00:38:32+5:30
सभापतिपदासाठी सेनेतील इच्छुकांत चुरस

सभापतिपदासाठी सेनेतील इच्छुकांत चुरस
मालेगाव : जिल्हाभरातील पंचायत समित्यांसह मालेगाव पंचायत समितीचेहीे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाले असून, मावळते सभापतिपद हे महिलावर्गाकडे असल्याने आता या पंचायत समितीच्या नवीन सभापतिपदासाठी पुरुष सदस्यांमध्ये चुरस वाढली आहे.
मालेगाव महानगरपालिकेत सोयगाव व द्याने या गावांचा समावेश झाल्याने जिल्हा परिषद सदस्य संख्या ही नऊ वरुन सातवर आली. तसेच पूर्वीची १८ सदस्यीय मालेगाव पंचायत समिती ही १४ सदस्यीय झाली. या पंचायत समितीवर गेली तीन पंचवार्षिक शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना व जनराज्य आघाडी यांच्यात जोरदार लढत झाली होती. आजमितीस सत्ताधारी शिवसेना - सात, जनराज्य आघाडी - पाच, मनसे - एक व अपक्ष एक असे पंचायत समितीतील संख्याबळ आहे. गेल्यावेळी शिवसेनेने निमगाव गणातील अपक्ष सदस्या सौ. आरती दीपक अहिरे यांना उपसभापतीपद देत सत्ता आपल्या ताब्यात राखली. मनसेचे पोपट भामरे हे तटस्थ राहिले होते तर जनराज्यचे पाचही सदस्य गैरहजर राहिले होते. त्यावेळी पंचायत समिती सभापतीपद हे महिला राखीव असल्याने या पदावर वऱ्हाणे येथील सौ. वंदना पवार बिनविरोध निवडून आल्या होत्या.
पक्षीय संख्याबळात बदल झाला नसला तरी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधातील जनराज्य आघाडीचे बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपात विलीनीकरण झाल्यामुळे मालेगाव पंचायत समिती सभापतीपद व उपसभापतीपद निवडणुकीचे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
पं. स. सभापती व उपसभापतीपदासाठी सेना भाजपाची पारंपारिक युती होईल की त्यांच्यात मैत्रीपुर्ण लढत होईल अशी चर्चा रंगली आहे. मैत्रीपुर्ण लढत झाली तरी सध्याचे संख्याबळ पाहत सेनेचेच पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. उपसभापतीपद दिलेल्या निमगाव गणातील सौ. अनिता अहिरे आपल्याच सोबत असल्यामुळे यंदाही पंचायत समितीवर सेनेचाच भगवा फडकेल, असा दावा सेनेतर्फे करण्यात येत आहे.
त्यामुळे तालुक्याचा पूर्वभाग व माळमाथा भागास न्याय देण्यासाठी यंदाचे पंचायत समिती सभापतीपद हे झोडग्याचे धर्मराज पवार यांना मिळण्याची शक्यता एकीकडे व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुका व त्यात दाभाडी गटगणाची महत्त्वपूर्ण भूमिका बघता सभापतीपदाची माळ अॅड. यशवंत मानकर यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमदार दादा भुसे यांना बहाल करण्यात आल्यामुळे आमदार भुसे काय निर्णय जाहीर करतात याकडे सेनेच्या सर्व पं. स. सदस्यांचे व जनतेचे लक्ष लागले आहे.
मोदक सजावट स्पर्धा
येवला : नेहरू युवा केंद्र नाशिक व स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंच येवला यांच्या वतीने उत्कृष्ट मोदक सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक पद्धतीने सजावट करून आकर्षक बनवून आणावे लागेल व उत्कृष्ट मोदक सजावट केलेल्या ११ स्पर्धकास बक्षीस देण्यात येतील.