संमेलनाचा अध्यक्ष हिंडता-फिरता असावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 01:42 AM2021-12-04T01:42:16+5:302021-12-04T01:43:01+5:30

साहित्य महामंडळाच्या घटनेत तीन वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर गतवर्षीच्या संमेलनावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रकृती बरी नसतानाही व्हीलचेअरवर येऊन किमान उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थिती लावून १ तास भाषण केले होते. मात्र, या संमेलनास ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर प्रकृतीच्या कारणास्तव येऊच शकले नाहीत. ते असते तर रसिकांना अधिक आनंद मिळाला असता. या दोन संमेलनांचा अनुभव पाहता महामंडळाला आपल्या घटनेत केलेल्या दुरुस्तीत पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ येते की काय, असे आता वाटू लागले आहे. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा किमान हिंडता, फिरता असावा, अशा शब्दांत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्या गैरहजेरीविषयी अप्रत्यक्ष नाराजी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केली.

The chairman of the meeting should be on the move | संमेलनाचा अध्यक्ष हिंडता-फिरता असावा 

संमेलनाचा अध्यक्ष हिंडता-फिरता असावा 

googlenewsNext
ठळक मुद्देकौतिकराव ठाले पाटील : तर साहित्य महामंडळाची घटना बदलावी लागेल

नाशिक : साहित्य महामंडळाच्या घटनेत तीन वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर गतवर्षीच्या संमेलनावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रकृती बरी नसतानाही व्हीलचेअरवर येऊन किमान उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थिती लावून १ तास भाषण केले होते. मात्र, या संमेलनास ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर प्रकृतीच्या कारणास्तव येऊच शकले नाहीत. ते असते तर रसिकांना अधिक आनंद मिळाला असता. या दोन संमेलनांचा अनुभव पाहता महामंडळाला आपल्या घटनेत केलेल्या दुरुस्तीत पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ येते की काय, असे आता वाटू लागले आहे. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा किमान हिंडता, फिरता असावा, अशा शब्दांत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्या गैरहजेरीविषयी अप्रत्यक्ष नाराजी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना कौतिकराव ठाले पाटील यांनी गेल्या वर्षापासून साहित्य संमेलन घेण्याचे ठरले होते, परंतु वर्षभरात गोदावरीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. परंतु, उशिरा का होईना संमेलन पार पडत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, अखिल भारतीय साहित्य महामंडळाने तीन वर्षांपूर्वी घटनेत दुरुस्ती केली. संहितेत बदल केले. परंतु दुसऱ्या व तिसऱ्या साहित्य संमेलनात ऐन वेळी अडचणी उभ्या राहिल्या. पहिले साहित्य संमेलन पार पडले. उस्मानाबाद येथील दुसऱ्या साहित्य संमेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्यभर त्यांनी सत्कार स्वीकारले, परंतु संमेलन दोन-तीन दिवसांवर आले असतानाच त्यांच्या पाठीच्या मणक्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांना डॉक्टरांनी प्रवासास मनाई केली. मात्र, उस्मानाबादकरांची अडचण लक्षात घेऊन दिब्रिटो यांनी विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करून व्हीलचेअरवर संमेलन गाठले व तीन तास संमेलनात हजर राहून मार्गदर्शनही केले. साहित्य संमेलनात होणारा लाखोंचा खर्च वाया जाऊ नये व महामंडळाची अडचण होऊ नये, अशी त्यांची त्यामागची भूमिका होती, असे सांगून ठाले पाटील यांनी मला जयंत नारळीकरांना दोष द्यायचा नाही, परंतु नारळीकरांची सर्व व्यवस्था करायला संयोजक तयार असताना त्यांनी एक किंवा अर्ध्या तासासाठी तरी हजेरी लावली असती, तर साऱ्यांना आनंद झाला असता, असे सांगितले.

साहित्य महामंडळाकडून अध्यक्ष निवडण्यासाठी केलेल्या घटना दुरुस्तीत पुन्हा बदल करावा लागतो की काय, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे सांगतानाच ठाले पाटील यांनी, ऐन वेळी कधी काय घडेल, हे सांगता येत नाही, त्यामुळे यापुढे जागरूकपणे अध्यक्ष निवडण्याची आवश्यकता असून, यापुढे तरी अध्यक्ष हा हिंडता, फिरता असावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तीनदिवसीय या संमेलनात भरगच्च कार्यक्रम आहेत. हल्ली संमेलनाचे स्वरूप बदलत चालले असून, हे बदल नेहमी संथगतीने होत असतात, असे सांगून ठाले पाटील यांनी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी एका लेखात केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, मराठीतील थाेर साहित्यिकांना यापूर्वी अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले. वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेऊन पुरवण्या काढल्या, महिनोन् महिने त्यावर चर्चा झाली, साहित्यिकांचे सत्कार झाले. परंतु सरस्वती पुरस्कार मिळालेल्या लिंबाळे यांनी साहित्य संमेलनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. गालबोट लावले. मला स्वत:ला बेशरम म्हटले तर या साहित्य संमेलनाला जातपातीत अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला. मुळात संमेलनात लिंबाळे यांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, त्यापूर्वीच त्यांनी संमेलनाविषयी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सत्कार हा कोणाला मागून मिळत नसतो, तो लोकांनी करायचा असतो, त्यामुळे शरणकुमार लिंबाळे यांनी त्याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही शेवटी ठाले पाटील यांनी दिला.

Web Title: The chairman of the meeting should be on the move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.