शंभराच्या नोटा एटीएममध्ये बंद
By Admin | Updated: November 13, 2016 00:18 IST2016-11-13T00:11:56+5:302016-11-13T00:18:01+5:30
शंभराच्या नोटा एटीएममध्ये बंद

शंभराच्या नोटा एटीएममध्ये बंद
नाशिक : खुल्या बाजारात शंभर व पन्नासच्या नोटांची टंचाई असल्याचे पाहून बॅँकांनी त्यांच्या एटीएममध्ये शंभराच्या नोटांचा भरणा केला असला तरी, त्याचा उपयोग फक्त एटीएमधारकांनाच होत असून, ज्यांच्याकडे एटीएम नाही अशांना मात्र अजूनही नोटांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.
तीन दिवसांपासून बॅँका व पोस्ट कार्यालयातून नागरिकांना चलनातील नोटा बदलून देण्यास सुरुवात झालेली असली तरी, दोन हजाराची नवीन नोट दिली जात आहे; मात्र ही नोट बाजारात चालविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. दोन हजार रुपयांसाठी सुटे नसल्याची सबब पुढे करून नवीन नोट बाजारात येऊनही त्याचा उपयोग होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शासनाने शंभर, पन्नासच्या नोटा चलनात कायम ठेवूनही त्याचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे नवीन नोटांचे चलन होण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
या संदर्भातील तक्रारींची दखल घेत बॅँकांनी एटीएममध्ये शंभराच्या नोटा भरल्या असल्या तरी, त्याचा वापर फक्त एटीएमधारकांनाच होत आहे. बाजारात शंभराच्या नोटा मुबलक चलनात आल्या तरच नवीन नोटांचाही वापर सुकर होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)