नाशिक : कांद्याचे घसरणारे बाजार भाव आणि कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात वारंवार होणाºया मागणीच्या पार्श्वभूमीवर दोन सदस्य केंद्रीय पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन कांदा लिलाव, कांद्याची दररोज होणारी आवक आणि बाजारभावाची माहिती घेऊन पाहणी केली.यंदाच्या हंगामात लांबलेला पाऊस आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यात कांदा पिकाचेही मोठे नुकसान होत कांद्याची आवक बाजार समित्यांमध्ये मंदावली होती. त्यामुळे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने लासलगाव बाजार समितीत ११ हजार १११ रु पये इतका उच्चांकी भाव कांद्याला मिळाला होता. त्यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी व कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. कांद्याला सरासरी पंधराशे ते अठराशे रु पये बाजार भाव मिळत असल्याने निर्यात बंदी उठवण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१४) लासलगाव बाजार समितीत केंद्रीय कृषी विभागाचे विशेष सचिव राजेश वर्मा व अपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्रन यांनी भेट देऊन पाहणी केली. पथकाने लासलगाव बाजार समितीत दररोज येणारी आवक, असलेले बाजारभाव आणि कांद्याच्या लिलावाची पद्धती जाणून घेतली. दरम्यान शेतकरी आणि बाजार समिती प्रशासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर असलेले निर्बंध तातडीने उठवण्याची मागणी केंद्रीय पथकाकडे केली.
कांदा स्थितीबाबत केंद्रीय पथकाने घेतली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 18:43 IST
लासलगाव बाजार समितीला भेट : शेतकऱ्यांकडून निवेदन
कांदा स्थितीबाबत केंद्रीय पथकाने घेतली माहिती
ठळक मुद्देकांद्यावरील निर्यात बंदी व कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण