केंद्रीय समिती करणार पाहणी
By Admin | Updated: November 19, 2015 23:28 IST2015-11-19T23:26:38+5:302015-11-19T23:28:36+5:30
दुष्काळ दौरा : जिल्हा प्रशासनाची धावपळ

केंद्रीय समिती करणार पाहणी
नाशिक : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती गुरुवारी रात्री औरंगाबाद येथे दिल्लीहून दाखल झाली असून, शुक्रवारी नाशिक जिल्ह्णातील तीन तालुक्यांच्या टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून ही समिती पुढे नगरकडे रवाना होणार आहे. या समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली असून, वरिष्ठ अधिकारी रात्रीच माहिती घेऊन औरंगाबादेत दाखल झाले आहेत.
मानस चौधरी व शंतनू विश्वास अशी केंद्र सरकारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे असून, गुरुवारी सायंकाळी दिल्लीहून ते औरंगाबाद येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नाशिक व नगर जिल्ह्णातील दुष्काळसदृश परिस्थितीची विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडून माहिती घेतली. शुक्रवारी सकाळी ही समिती औरंगाबादहून येवला येथे येणार आहे.
येवला तालुक्यातील दुष्काळसदृश काही गावांना भेटी देऊन ही समिती नांदगावच्याही दौऱ्यावर जाणार आहे व तेथून पुन्हा येवला मार्गे सिन्नर तालुक्यातील तीन गावांना भेट देऊन पुढे नगरकडे रवाना होईल. राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात नजर पैसेवारीवरूनच दुष्काळसदृश गावांची घोषणा केल्यामुळे त्यावर उपाययोजनेसाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आलेली आहे. त्यापार्श्वभूमीवर या समितीच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.