सीमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट
By Admin | Updated: July 28, 2016 00:41 IST2016-07-28T00:35:54+5:302016-07-28T00:41:00+5:30
ग्रामस्थ आक्रमक : अधिकारी, ठेकेदाराविरु द्ध कारवाईची मागणी

सीमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट
पिळकोस : कळवण तालुक्यातील रवळजी येथे तीन महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या सीमेंट प्लग बंधाऱ्यातून नुकत्याच झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी व बंधाऱ्याची दुरुस्ती होऊन गळती त्वरित थांबवावी, अशी मागणी रवळजीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य भास्कर भालेराव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निकृष्ट बांधकामासंदर्भात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भास्कर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दहा दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. संबंधितांकडून याची कुठलीच दखल घेतली न गेल्यामुळे आता गावातील शिष्टमंडळ घेऊन जलसंधारणमंत्र्यांकडे दाद मागण्यास जाणार असल्याचे व त्यानंतर ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कडक कारवाईसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात येत्या दोन-तीन दिवसांत ग्रामस्थांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थ आणि भालेराव यांच्याकडून सांगण्यात आले.
कळवण तालुक्यात जलसंधारणाची जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत; मात्र या कामांच्या दर्जाबाबत शंका निर्माण होईल अशा पद्धतीने तालुक्यात कामे केली गेली आहेत, असे आरोपही सर्वत्र होत आहेत. लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी व एजन्सी यांचे एकमेकात हितसंबंध जुळल्याने निकृष्ट कामाची मालिका सुरू आहे. तालुक्यातील रवळजी येथे मोठ्या नाल्यावर लक्षावधी रु पये खर्च करून सीमेंट प्लग बंधारा बांधण्यात आला. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे बंधारा पूर्णपणे भरला. परंतु निकृष्ट कामाचा नमुना असलेल्या या बंधाऱ्यात पावसाचे पाणी साचले खरे; पण या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने बंधारा रिकामा होऊ लागला आहे. यामुळे जलसंधारण करण्याच्या मूळ उद्देशाला कळवण तालुक्यात हरताळ फासला गेला आहे.
रवळजी येथे बांधण्यात आलेला सीमेंट प्लग बंधारा एप्रिल महिन्यात बांधून पूर्ण करण्यात आला. बंधारा तयार करतेवेळी यात मोठ्या प्रमाणात दगड टाकण्यात आले. याबद्दल भास्कर भालेराव यांनी स्वत: संबंधित विभागाकडे तोंडी तक्रार केली; मात्र याकडे दुर्लक्ष करत कुठलाही संबंधित विभागाचा अधिकारी कामाच्या ठिकाणी पाहणीसाठी आला
नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीला न जुमानता, ठेकेदाराला पाठीशी घालून बंधारा कामात दगड वापरणाऱ्या ठेकेदाराला अभय दिले, असा आरोपही ग्रामस्थांकडून होत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व्हावी व ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी असून, येत्या दोन-तीन दिवसांत याची चौकशी सुरू न झाल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
दहा दिवसांपूर्वी तालुक्यातील तहसीलदार, प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी, शाखा अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांना बंधारा गळतीबाबत निवेदन देऊनही त्यांनी ग्रामस्थांच्या निवेदनाला कुठलीच दाद दिली नसून त्यांच्याकडून ठोस
कारवाई होत नसल्यामुळे रवळजी गावाचे शिष्टमंडळ घेऊन जलसंधारणमंत्र्यांकडे अधिकारी व ठेकेदार यांच्याविरु द्ध दाद मागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)